फुल्ल गर्दी... मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला फाटा, शिवसेना नेत्यांचा भव्य उद्घाटन सोहळा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2022 06:24 PM2022-01-07T18:24:33+5:302022-01-07T18:25:16+5:30
राज्यात कोरोनाचे संकट वाढत असून ठाण्यात देखील कोरोना रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ होत आहे. येथील रुग्णांचा आकडा 2 हजारांच्या पार गेल्याने पालिका प्रशासनाने काळजी घेण्याचे सूचवले आहे.
रणजीत इंगळे
ठाणे - राज्यात आणि विशेषत: मुंबईकर कोरोना वाढीच्या पार्श्वभूमीवर एकीकडे मुख्यमंत्र्यांनी गर्दी न करण्याचे आवाहन केले आहे. तर, प्रशासनाने कोरोना नियमांचे पालन करण्याचेही बजावले. मात्र, दुसरीकडे शिवसेनेची सत्ता असलेल्या ठाण्यात महापौरांनी या आवाहनाला फाटा देत भव्य उद्घाटन सोहळा आयोजित केला होता. याठिकाणी कोरोना नियमांचा फज्जा उडाल्याचे दिसून आले. एकट्या मुंबईतील आकडा दैनिक 20 हजारांच्या पुढे गेल्याने चिंता वाढली असताना हा कार्यक्रम म्हणजे दुसऱ्या सांगे ब्रह्मज्ञान... असेच शिवसेनेचं दिसून येत आहे.
राज्यात कोरोनाचे संकट वाढत असून ठाण्यात देखील कोरोना रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ होत आहे. येथील रुग्णांचा आकडा 2 हजारांच्या पार गेल्याने पालिका प्रशासनाने काळजी घेण्याचे सूचवले आहे. कोरोना नियमांचे पालन न करणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांवर कठोर कारवाई केली जाते. मग, राजकीय कार्यक्रम आयोजित करणाऱ्यांवर कारवाई का केली जात नाही, असा प्रश्न ठाणेकर जनतेतून विचारला जात आहे. ठाण्याचे प्रथम नागरिक महापौरच अशारितीने कोरोना नियमांचा फज्जा उडवत असतील तर कोरोना रुग्णसंख्या कशी कमी होईल? असा प्रश्न उपस्थित होतोय.
दरम्यान, ठाणे महापौरांना कोरोनाचे गांभीर्य कधी समजेल व नियम पाळण्याचे शहाणपण कधी सुचेल, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र, एकीकडे कोरोनामुळे प्रशासनाकडूनच नियमावलींवर बोट ठेवण्यात येत असून दुसरीकडे महापौरांनाच गर्दीचे भान नसल्याचे दिसून येत आहे.