मीरा रोडच्या मुलांनी बनवले खतमिश्रित मातीचे गणपती बाप्पा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2018 03:04 AM2018-09-22T03:04:13+5:302018-09-22T03:04:24+5:30
रासायनिक रंगाचा वापर करून बनवल्या जाणाऱ्या गणपतीच्या मूर्तींमुळे पर्यावरणाचा -हास होत असल्याने मीरा रोडच्या गीतानगरमधील अजय राठोड व ४१ मुलांनी खतमिश्रित मातीच्या ८१ लहान मूर्ती रंगाचा वापर न करता बनवल्या आहेत.
- धीरज परब
मीरा रोड : घातक असे प्लास्टर आॅफ पॅरिस व रासायनिक रंगाचा वापर करून बनवल्या जाणाऱ्या गणपतीच्या मूर्तींमुळे पर्यावरणाचा -हास होत असल्याने मीरा रोडच्या गीतानगरमधील अजय राठोड व ४१ मुलांनी खतमिश्रित मातीच्या ८१ लहान मूर्ती रंगाचा वापर न करता बनवल्या आहेत. बाप्पाच्या उदरात बदाम आदी झाडांचे बीज रोवले असून अनंत चतुर्दशीच्या दिवशी छोटे खड्डे खणून त्यात पाणी भरून त्यात या बाप्पांचे विसर्जन करत वृक्षलागवड केली जाणार आहे.
गीतानगरच्या फेज-२ व ३ मध्ये ११९ इमारती आहेत. येथे राहणारे संशोधक अजय राठोड हे ग्रीन अर्थ सिव्हिलायझेशन मोहीम चालवतात. त्यासाठी त्यांचे विविध शोध आदी सुरू असतात. गणेशोत्सवासाठी सर्रास प्लास्टर आॅफ पॅरिसच्या मूर्ती व त्यावर रासायनिक रंग वापरला जातो. पीओपी जलाशयात साचून राहते व ते अत्यंत घातक असते. रंगही घातक असतात. याचे अत्यंत वाईट परिणाम होतात.
मीरा- भार्इंदरमध्येही गणपतीच्या मूर्तींसाठी वर्षाला तब्बल दीड हजार टन पीओपीचा वापर केला जातो. पर्यावरणपूरक उत्सव साजरे करण्याचे निर्देश सरकार, न्यायालयाचे असले तरी त्याचे सर्रास उल्लंघन केले जाते. यामुळे आधीच सांडपाण्याने दूषित नैसर्गिक जलाशय खूपच प्रदूषित झाले आहेत. यातूनच राठोड यांनी मातीच्या लहान मूर्तींची संकल्पना राबवली. त्या अनुषंगाने त्यांनी खतमिश्रित माती आणली. मुलांना गणपतीच्या मूर्ती बनवण्यासाठी प्रोत्साहित केले. ३ ते १५ वयोगटांतील ४१ मुलांनी यासाठी तयारी दर्शवली. गणेशोत्सव असतानाही चांगला प्रतिसाद मिळाला.
>गोट्याचा गणपती
असे नामकरण
माती आणि खतमिश्रित बाप्पांच्या मूर्तींमधील बियांमुळे वृक्षारोपण होणार आहे.
बदाम, पिंपळाची झाडे लावल्यामुळे चिमणी, पोपट आदी पक्ष्यांची वर्दळ वाढणार आहे.
या संकल्पनेला गोट्याचा गणपती असे नामकरण करून सोशल मीडियाच्या माध्यमातून जनजागृती करणार असल्याचे अजय म्हणाले. सहभागी मुलांना प्रशस्तीपत्रक देऊन कौतुक करण्यात आले.