दोन महिन्यांपासून आजीचे वास्तव्य अंधारात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2020 11:44 PM2020-11-26T23:44:08+5:302020-11-26T23:44:26+5:30
वीजबिलाचा शॉक नको
ठाणे : वाढीव वीजबिलाचा शॉक नको म्हणून चंदनवाडी परिसरातील ६५ वर्षांच्या आजीबाई गेले दोन महिने अंधारात राहत आहेत. गेली १० वर्षे भटक्या प्राण्यांना आश्रय देणाऱ्या आजीबाईंनी वाढीव वीजबिलाची धास्ती घेतली असल्याने त्यांनी सायंकाळी अंधारातच राहण्याचे ठरविले आहे. मनसेने ही बाब समोर आणून त्यांच्या पाठीशी राहण्याचे आश्वासन दिले. तसेच, त्यांची वीज कापून नेल्यास महावितरणला मनसे स्टाईलने धडा शिकवला जाईल, असा इशाराही दिला.
वाढीव वीजबिल रद्द करण्यासाठी सकाळी मनसेने आंदोलन केले असता दुसरीकडे संध्याकाळी मनसेने एक वेगळा प्रकार समोर आणला. मनसेचे कोपरी पाचपाखाडी विभाग अध्यक्ष महेश कदम यांच्याकडे त्यांच्या परिसरात गेली अनेक वर्षे वास्तव्यास असणाऱ्या ६५ वर्षांच्या आजीबाई लक्ष्मी सूर्यवंशी यांना वीजबिल वाढीव आल्यानंतर त्या गेले दोन महिने अंधारात राहत असल्याचे उघड झाले. त्यांना लॉकडाऊन काळात दहा हजार रुपये बिल आले. त्यांना या बिलाचा इतका धक्का बसला की सायंकाळी सहानंतर त्या दिवे लावत नाहीत. मेणबत्ती लावून त्या घरात काम करतात तर दिवसा उजेड असल्याने त्या उजेडातच काम करतात. आजीबाईच्या मुलाचे निधन झाले असून त्या आपल्या मुलीसोबत राहतात. रस्त्यावरील कुत्री-मांजरींना कोणीही मारत असते, गाडीखाली येऊन त्यांचे अपघात होतात म्हणून प्राण्यांवर प्रेम करणाऱ्या या आजीबाईंनी आपल्या घरात १० कुत्री, सात मांजरींना आश्रय दिला आहे. दहा बाय दहाच्या खोलीत राहणाऱ्या या आजीबाई गेले दोन महिने अंधारात राहत आहेत. लाइट लावायची मला भीती वाटते, असे सांगताना त्यांच्या डोळ्यात अश्रू आले होते.
मनसेस्टाइल धडा शिकवण्याचा इशारा
अंधारात राहणाऱ्या या आजीबाईंची प्रथम भीती दूर केली. त्यांना वीजबिल भरू नका, असे मी स्पष्ट सांगितले आहे. जर या आजीबाईंची वीज कापायला कोणी अधिकारी आले तर त्यांना मनसे स्टाईल धडा शिकवला जाईल, असे महेश कदम यांनी सांगितले.