आपल्याला घरी नेतील या आशेवर ५७ वर्षांपासून आजी वाट पाहत आहे; नातलगांनी फिरवली पाठ

By प्रज्ञा म्हात्रे | Published: January 9, 2024 10:50 AM2024-01-09T10:50:59+5:302024-01-09T10:52:13+5:30

४२ वर्षांपासून रामूला नातेवाईक आणि घराचा पत्ता आठवतच नाही

Grandma has been waiting for 57 years hoping to be taken home; Relatives turned their backs | आपल्याला घरी नेतील या आशेवर ५७ वर्षांपासून आजी वाट पाहत आहे; नातलगांनी फिरवली पाठ

आपल्याला घरी नेतील या आशेवर ५७ वर्षांपासून आजी वाट पाहत आहे; नातलगांनी फिरवली पाठ

प्रज्ञा म्हात्रे, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: गेली ५७ वर्षे गंगुबाई (वय ८०) (नाव बदलले आहे.) ठाण्याच्या मनोरुग्णालयात खितपत पडल्या आहेत. आता त्यांना चालता येत नाही. स्वत:ला ओढत त्या पुढे सरकतात. दृष्टिहीन गंगुबाई या रोज घरी जायचेय, नातेवाइकांना भेटायचेय, असे कर्मचाऱ्यांना सांगत असतात. मात्र, त्यांना घरी नेण्यास नातलग तयार नाहीत.

दीड वर्षापूर्वी त्यांच्या ८७ वर्षांच्या भावाची माहिती मनोरुग्णालयास मिळाली. मात्र, तेही ८० वर्षांच्या बहिणीची काळजी घ्यायला तयार नाहीत. तसेच गेली ४२ वर्षे रामू (नाव बदलले आहे.) हेही मनोरुग्णालयात दाखल आहेत. दिव्यांग रामूला आपला पत्ता आजतागायत सांगता आलेला नसल्याने त्याच्या नातलगांचा थांगपत्ता लागलेला नाही. ठाण्याचे मनोरुग्णालय हेच आता रामूचे घर झाले आहे. आपल्याला अखेरच्या श्वासापर्यंत येथून कुठेही पाठवू नका, अशीही आर्जव रामू करतो.

१९६५ साली गंगूबाई ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयात दाखल झाल्या. समुपदेशक, अधीक्षकांच्या माध्यमातून त्यांच्या कुटुंबीयांचा शोध घेतला. मात्र, त्यांनी दिलेला पत्ता चुकीचा असल्याने नातेवाइकांचा शोध सुरूच राहिला. ज्यावेळी नातेवाईक सापडले त्यावेळी मात्र त्यांनी हात वर केले. आम्ही हिला ॲडमिट केले नाही. त्यामुळे घेऊन जाऊ शकत नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. नातेवाइकांना गंगुबाईंचे तोंडही पाहायचे नाही.

  • वरचेवर फिट येत असलेल्या दिव्यांग रामूला १९८१ साली धुळे न्यायालयाने मनोरुग्णालयात दाखल केले होते. त्याची आकलन शक्ती कमी असल्याने त्याला अद्याप त्याचा पत्ता सांगता आलेला नाही. 
  • २०२१ साली रामूला जागृती पुनर्वसन केंद्रात नेण्यात आले, त्यावेळी तो महिनाभरातच परत आला. आपण मनोरुग्णालय सोडून कुठेच जाणार नाही, असे तो सांगतो. 
  • रामू हिंदी भाषिक आहे; पण ४२ वर्षांत तो मराठी शिकला. प्रत्येक कर्मचाऱ्याला तो ओळखतो. इतर रुग्णांशी आणि कर्मचाऱ्यांशी गप्पा मारतो. त्याला उच्च रक्तदाबाचा त्रास आहे.


चार भिंतीबाहेरील निष्ठूर जग

  • गंगुबाईचा पत्ता शोधण्यासाठी ब्रह्मदेव जाधव या समाजसेवा अधीक्षकांनी प्रचंड मेहनत घेतली. आजीदेखील घराच्या ओढीने, नातेवाईकांना भेटायला मिळावे म्हणून मनाेरुग्णालयात कुढत आहे.
  • ४२ आणि ५७ वर्षे मनोरुग्णालय हेच घर झालेल्या रामू आणि गंगुबाई यांच्या कहाण्या मनोरुग्णालयाच्या चार भिंतीबाहेरच्या जगातील कोत्या ‘मनोरुग्णां’चे दर्शन घडवत आहेत.


४२ वर्षे येथे राहिलेल्या रुग्णाचे पुनर्वसन करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, तो पुन्हा परत आला. ५७ वर्षे  मनोरुग्णालयात राहिलेल्या महिलेची तुटलेल्या नात्याची नाळ जुळत नाही. नातलग वेगवेगळी कारणे सांगून तिला घरी घेऊन जात नाहीत. या रुग्णांना कुटुंबात, समाजात जगण्याचा अधिकार देण्यासाठी नातेवाइकांनी त्यांना दीर्घकाळ रुग्णालयात ठेवू नये. कुटुंब, समाजातील वातावरणाचा आनंद त्यांना द्यावा. तरच खऱ्या अर्थाने त्यांचे पुनर्वसन होईल.
-डॉ. नेताजी मुळीक, वैद्यकीय अधीक्षक, ठाणे

Web Title: Grandma has been waiting for 57 years hoping to be taken home; Relatives turned their backs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे