आजींनी पटकावली खुर्ची, आजोबांचा विटीला फटका, आजीआजोबा संमेलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2018 06:29 AM2018-01-28T06:29:31+5:302018-01-28T06:29:36+5:30
संगीतखुर्ची, विटीदांडू, चमचालिंबू असे खेळ खेळताना त्यांच्यातील खळखळते बाल्य उसळी मारून बाहेर आले. त्यांच्यात कुणी ब्लडप्रेशरचे तर कुणी डायबेटीसचे पेशंट होते. मात्र, संगीतखुर्चीत पळत जाऊन खुर्ची पटकावताना किंवा विटीला जोरदार फटका खेचताना त्यांना चक्क आपल्या आजारपणाचा विसर पडला.
डोंबिवली : संगीतखुर्ची, विटीदांडू, चमचालिंबू असे खेळ खेळताना त्यांच्यातील खळखळते बाल्य उसळी मारून बाहेर आले. त्यांच्यात कुणी ब्लडप्रेशरचे तर कुणी डायबेटीसचे पेशंट होते. मात्र, संगीतखुर्चीत पळत जाऊन खुर्ची पटकावताना किंवा विटीला जोरदार फटका खेचताना त्यांना चक्क आपल्या आजारपणाचा विसर पडला. बालपणीच्या आठवणींना उजाळा देत आजीआजोबांनी फुल्ल-टू-धम्माल उडवली. अर्थात, निमित्त होते ते विद्यानिकेतन शाळेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या आजीआजोबा संमेलनाचे.
आजी... आजी जोरात पळ, ती बघ खुर्ची... असं सांगत छोटा राहुल आपल्या आजीला संगीतखुर्चीच्या खेळात प्रोत्साहन देत होता, तर चमचालिंबू घेऊन जाणाºया आजोबांना चिमुकली ईशा टाळ्या वाजवून चिअरअप करत होती. संगीताचा दणदणाट सुरू असताना पटकन खुर्ची पटकावण्याची अॅक्शन करून एखाद्या आजी या आजोबांची फिरकी घेत होत्या, तर आजोबांच्या विटीदांडूच्या खेळातील उत्साह पाहून आजी त्यांना प्रोत्साहित करत होत्या. या संमेलनात छोटे होण्याचा मनमुराद आनंद लुटलेल्या आजीआजोबांची संख्या थोडीथोडकी नव्हे चक्क ५०० ते ५५० होती.
बहुतांश विद्यार्थ्यांचे पालक नोकरी करत असल्याने आपल्या नातवाला आजीआजोबा सोडतात. परंतु, आपल्या नातवाची शाळा कशी आहे, हे आजीआजोबांना समजावे म्हणून स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात येत असल्याचे पंडित यांनी सांगितले. पालकसभा अथवा परीक्षांचा निकाल या दोन दिवशी विद्यार्थ्यांचे पालक शाळेत येतात. त्यावेळी पालक आपल्या मुलामुलींच्या विकासाचा आढावा घेतात. या संमेलनामुळे आपल्या नातवांच्या शाळेत आनंदाचे क्षण घालवता आले. तसेच या संमेलनामुळे त्यांच्यातील सुप्तगुणांना वाव मिळाल्याची कबुली आजीआजोबांनी दिली. यावेळी आजीआजोबांच्या मनोरंजनासाठी संगीत, गायन, वादन, नृत्य अशी सांगीतिक मैफल ठेवली होती. कॉर्पोरेट कीर्तनाचेही आयोजन केले होते. शाळेतील शिक्षकांनी आजींच्या हातांवर मेहंदी काढली.
शाळा एक कुटुंब
विद्यानिकेतन शाळेचे संस्थापक व प्राचार्य विवेक पंडित गेली अनेक वर्षे आजीआजोबांसाठी संमेलन आयोजित करत आहेत. शाळा हे एक कुटुंब आहे. कुटंबातील प्रत्येक विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी त्यांच्या आजीआजोबांसाठी अनेक उपक्रम शाळेकडून हाती घेतले जातात. त्याचाच शनिवारचे हे संमेलन एक भाग होते.