पेन्शनचे पैसे घेतल्याचा संशय घेणाऱ्या आजीचा खून करणाऱ्या नातवाला अटक
By जितेंद्र कालेकर | Published: October 11, 2024 12:09 AM2024-10-11T00:09:47+5:302024-10-11T00:10:01+5:30
ठाण्याच्या वागळे इस्टेट मधील घटना: वरवंटयाने डोक्यावर केले प्रहार.
जितेंद्र कालेकर, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: पेन्शनचे १२ हजार रुपये घेतल्याचा संशय घेणाऱ्या दयावती हरिराम चौहान या ७७ वर्षीय आजीच्या डोक्यावर वरवंटयाने प्रहार करीत तिचा खून करणाऱ्या अभि उर्फ अवि विष्णू चौहान (२०, रा. साठेनगर, वागळे इस्टेट, ठाणे) या आरोपीला अटक केल्याची माहिती श्रीनगर पोलिसांनी गुरुवारी दिली. त्याला १५ ऑक्टाेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
साठेनगरातील संत मुक्ताबाई चाळीमध्ये राहणाऱ्या दयावती यांच्या निवृत्ती वेतनाचे १२ हजार रुपये चोरीस गेले होते. हे पैसे तिचाच नातू अभि याने चोरल्याचा संशय तिला होता. याच संशयातून त्याची बहिण खुशबू हिच्याबरोबरही त्याचे कडाक्याचे भांडण झाले होते. हाच राग मनात धरुन अभि याने ९ ऑक्टाेंबर २०२४ रोजी दुपारी १२.४५ वाजण्याच्या सुमारास आजीशी भांडण करुन घराच्या लोखंडी ग्रीलचा दरवाजा आतून बंद केला. त्यानंतर घरातील वरवंटयाने आजीच्या डोक्यात चार ते पाच वेळा प्रहार केले. यात ती गंभीर जखमी होऊन रक्त भंबाळ झाली. तिचा आरडाओरडा झाल्याने शेजारील काही लोकांनी त्याला अडविण्याचा प्रयत्नही केला. मात्र, रागाच्या भरात त्याने तिच्यावर हल्ला केला. या हल्ल्याची माहिती मिळताच घटनास्ळी वागळे इस्टेट परिमंडळाचे उपायुक्त अमरसिंह जाधव,
श्रीनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक गुलझारीलाल फडतरे आणि उपनिरीक्षक नितीन हांगे यांच्या पथकाने धाव घेतली. त्यावेळी घरातच असलेला हल्लेखोर आरोपी नातू अभि याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली.