देहविक्री करणाऱ्या महिलांसह त्यांच्या बालकांना मिळाले अनुदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 05:17 AM2021-03-04T05:17:00+5:302021-03-04T05:17:00+5:30
ठाणे : ठाणे जिल्ह्यात वर्षभरापासून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यात टाळेबंदीचा फटका सर्वसामान्य नागरिकांसह देहविक्री ...
ठाणे : ठाणे जिल्ह्यात वर्षभरापासून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यात टाळेबंदीचा फटका सर्वसामान्य नागरिकांसह देहविक्री करून उदरनिर्वाह करणाऱ्या महिलांनादेखील बसला आहे. त्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा कसा, असा प्रश्न उभा ठाकला होता. यासंदर्भात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर दिलेल्या निर्णयानुसार या व्यवसायात कार्यरत महिलांना व ज्या महिलांची मुले शाळेत जातात अशा महिलांना अतिरिक्त आर्थिक मदत कोणत्याही ओळखपत्राशिवाय देण्यात येणार आहे. त्यानुसार जिल्ह्यातील महिलांना अप्पर जिल्हाधिकारी वैदही रानडे यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात धनादेशाचे वाटप करण्यात आले. ९०० महिलांना शिधापत्रिकांचेदेखील वाटप करण्यात आले. यावेळी शिधावाटप फ विभाग उपनियंत्रक नरेश वंजारी, ठाणे जिल्हा महिला व बालविकास अधिकरी महेंद्र गायकवाड आदी उपस्थित होते.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेल्या टाळेबंदीमुळे अत्यावश्यक सेवेतील आस्थापनाव्यतिरिक्त इतर सर्व कार्यालये बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे खासगी क्षेत्रासह विविध आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींवर बेरोजगारीची, तर अनेकांवर उपासमारीची वेळ ओढवली. त्यात देहविक्री करून आपला व मुलांचा सांभाळ करणाऱ्या महिलांवरदेखील या टाळेबंदीचा परिणाम जाणवू लागला होता. या महिलांनादेखील उदरनिर्वाहासाठी आर्थिक मदत मिळावी, यासाठी नॅशनल एड्स कंट्रोल ऑर्गनायझेशन (नॅको) या संस्थेकडून दाखल याचिकेमध्ये वेश्याव्यवसायात कार्यरत महिला व त्यांच्या मुलांना कोविड कालावधीमध्ये अर्थसाहाय्य उपलब्ध करून देण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिले आहेत. त्याअनुषंगाने राज्यात तत्काळ कार्यवाही होण्यासाठी महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी यंत्रणेला गतिमान कार्यवाहीचे निर्देश दिले होते. त्यानुसार देहविक्री करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या महिलांना कोरडे अन्नधान्य व रोख आर्थिक साहाय्य यासारख्या मूलभूत सेवा पुरविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार या व्यवसायात कार्यरत ओळख निश्चित केलेल्या महिलांना दरमहा ५ हजार रुपये आणि ज्या महिलांची मुले शाळेत जातात अशा महिलांना अतिरिक्त २,५०० रुपये कोणत्याही ओळखपत्राशिवाय देण्यात येणार आहे. त्यानुसार, ठाणे जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्ष यांच्याकडून १,४३९ महिलांची नावे व त्यांच्या बँक खात्यांची माहिती या कार्यालयास प्राप्त झाली आहे. या महिलांच्या बँक खात्यात ८६ लाख ७२ हजार ५०० इतकी रक्कम डीबीटी पध्दतीव्दारे वर्ग करण्यात आली.
...................
९५२ महिलांना दिले रेशनकार्ड
ज्या महिलांकडे बँक खाते नाही, रेशनकार्ड नाही अशा महिलांचे बँक खाते सुरू करणे, रेशनकार्ड काढण्यासाठी जिल्हा महिला व बालविकास अधिकाऱ्यांनी वारंवार पाठपुरावा केला आणि त्यांच्या बँक खात्यावर अर्थसाहाय्याची रक्कम वर्ग केली आहे. ज्या महिलांकडे रेशनकार्ड नाही अशा महिलांना रेशनकार्ड काढून देण्याबाबत संबंधित शिधावाटप अधिकाऱ्यांना सूचना केल्या. त्यानुसार ९५२ महिलांना रेशनकार्ड उपलब्ध करून दिल्याची माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी महेंद्र गायकवाड यांनी दिली.