मैदानात उगवले गवतांचे रान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 04:42 AM2021-08-23T04:42:49+5:302021-08-23T04:42:49+5:30
प्रशांत माने : लोकमत न्यूज नेटवर्क कल्याण : मैदाने आणि उद्याने सकाळी ६ ते रात्री १० पर्यंत नागरिकांसाठी खुली ...
प्रशांत माने : लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : मैदाने आणि उद्याने सकाळी ६ ते रात्री १० पर्यंत नागरिकांसाठी खुली करण्याचे आदेश हे मुंबई महापालिका क्षेत्रापुरतेच मर्यादित आहेत. ठाणे जिल्ह्यात सकाळी सहा ते दहा अशी वेळेची मर्यादा आहे. मैदान आणि उद्याने ही केवळ मॉर्निंग वॉकसाठी येणाऱ्यांसाठीच खुली होतील, असेही बंधन घातले आहे. कोरोना प्रादुर्भावात बरीच महिने बंद असलेली मैदाने आणि उद्याने सध्या काही वेळेपुरती खुली झाली आहेत. देखभालीअभावी ती बकाल झाली आहे. सततच्या पावसामुळे गवताचे रान उगविले असताना जॉगिंग ट्रॅकची वाट शेवाळीने निसरडी झाली आहे. डोंबिवली पश्चिमेतील भागशाळा या एकमेव मैदानाचा अपवाद वगळता कल्याण-डोंबिवलीतील बहुतांश मैदाने आणि उद्यानांची अवस्था दयनीय झाली आहे.
महापालिका क्षेत्रांत ६५ उद्याने आणि १९ मैदाने आहेत. डोंबिवलीचा आढावा घेतला असता पूर्वेतील ह.भ.प. कै. सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडासंकुल, नेहरू मैदान, डोंबिवली जिमखाना, पश्चिमेतील बावनचाळ परिसरातील रेल्वे आणि भागशाळा मैदानांचा खेळाडू आणि वॉकसाठी वापर केला जातो. क्रीडासंकुल आणि जिमखाना या ठिकाणी कोविड उपचार केंद्र असल्याने ते बंद आहेत. नेहरू मैदानातही गवत वाढले आहे. पश्चिमेतील रेल्वे मैदानाचीही हीच अवस्था आहे. महापालिकेचे माजी परिवहन सदस्य आणि मनसेचे पदाधिकारी प्रल्हाद म्हात्रे यांच्या पुढाकारामुळे येथील भागशाळा मैदान सुस्थितीत आहे. नेहरू रोडवरील छत्रपती शिवाजी महाराज उद्यान आणि ज्येष्ठ नागरिक कट्टा अद्याप बंद आहे. या उद्यानाची जबाबदारी सध्या श्री गणेशमंदिर संस्थानकडे आहे. भाजपचे माजी नगरसेवक तथा श्री गणेश मंदिर संस्थानाचे अध्यक्ष राहुल दामले यांच्या पुढाकाराने येथे देखभाल केली जात आहे.
कल्याणमध्येही बहुतांश मैदाने आणि उद्यानांत गवताचे रान वाढले आहे. वासुदेव बळवंत फडके मैदानात लहान मुलांची खेळणी गवताच्या आड दिसेनाशी झाली आहेत; तर महापालिकेच्या मुख्यालयाला लागून असलेल्या सुभाष मैदानात चिखल आणि पाण्याची डबकी साचली आहेत. पाऊस आणि गवतामुळे निसरडे झालेल्या जॉगिंग ट्रॅकमुळे वॉकसाठी रस्त्याचाच आधार नागरिक घेत आहेत.
----------------------------------------
राज्य सरकारने मैदाने आणि उद्याने खुली केली ही निश्चितच समाधानाची बाब आहे. मैदाने, उद्याने सुस्थितीत हवीत. प्रल्हाद म्हात्रे यांच्या पुढाकाराने भागशाळा मैदानाचा कायापालट झाला आहे. जॉगिंग ट्रॅक सुस्थितीत असताना त्या ठिकाणी बसायला बाकडीही आहेत. त्यामुळे आम्हा ज्येष्ठांना त्या ठिकाणी वॉक करताना कोणतीही अडचण येत नाही.
- जनार्दन जावसेन, ज्येष्ठ नागरिक, डोंबिवली पश्चिम
----------------------------------------
पावसामुळे मैदाने आणि उद्याने निसरडी होतात. त्यात गवतही उगवते. पावसाच्या कालावधीत ती फिरण्यासाठी योग्य राहत नाहीत. सध्या पाऊस सतत पडत आहे. त्यामुळे गवत कितीही कापले तरी ते काही दिवसांतच पुन्हा उगवते. त्यात पावसात सहसा मैदान आणि उद्यानात नागरिक, लहान मुले येत नाहीत. त्यामुळे ती बंदच ठेवावी लागतात. पावसात खेळल्या जाणाऱ्या फुटबॉलसाठी कल्याणमधील यशवंतराव चव्हाण क्रीडांगण (मॅक्सी ग्राउंड) आणि नानासाहेब धर्माधिकारी क्रीडांगण या दोन मैदानांना खेळाडूंकडून विशेष पसंती असते. त्यामुळे त्या ठिकाणी उगवलेले गवत कापण्यात आले आहे. उर्वरित मैदान आणि उद्यानांतील गवत कापण्यात येणार आहे.
- संजय जाधव, मुख्य उद्यान अधीक्षक, केडीएमसी
----------------------------------------------------
फोटो आनंद मोरे