सर्वधर्मियांसाठी एकाच छताखाली स्मशानभूमी
By admin | Published: March 15, 2017 02:26 AM2017-03-15T02:26:15+5:302017-03-15T02:26:15+5:30
ठाणे महापालिकेने आता एकाच छताखाली सर्वधर्मीयांसाठी स्मशानभूमी उभारण्याचे प्रस्तावित केले आहे.
ठाणे : ठाणे महापालिकेने आता एकाच छताखाली सर्वधर्मीयांसाठी स्मशानभूमी उभारण्याचे प्रस्तावित केले आहे. त्यानुसार या संदर्भातील महत्त्वाचा प्रस्ताव येत्या महासभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवला आहे. तब्बल ३७ हजार चौ.मी. क्षेत्रफळावर या स्मशानभूमी विकसित केल्या जाणार आहेत.
वाढत्या लोकसंख्येच्या अनुषंगाने विविध धर्मियांची संख्यादेखील वाढत आहे. परंतु, त्यांच्यासाठी स्मशानभूमी नसल्याचा मुद्दा अनेकदा स्थायी आणि महासभेत गाजला आहे. यामुळेच आता घोडबंदर-भार्इंदरपाडा येथील सेक्टर क्र. ६ मधील ३७ हजार चौ.मी.चे क्षेत्र स्मशानभूमीसाठी विकसित करण्याचे प्रशासनाने निश्चित केले आहे. त्यानुसार ३७ हजार चौ.मी. जमीन हरित विभागातून वगळून त्याठिकाणी ही संयुक्त स्मशानभूमी उभारण्यात येणार आहेत. तसेच येथेच स्मृती उद्यानही विकसित केले जाणार असून या आरक्षणामध्ये ३० मीटर रुंदीचा बफर झोन ठेवण्याच्या अटी सापेक्ष आरक्षण शासन निर्णयानुसार मंजूर केले आहे.
यानुसार संपूर्ण स्मशानभुमींचा लेआऊट तयार करण्याचा आणि समाजानुसार क्षेत्रफळ निश्चित करण्याचा एकत्रित प्रस्ताव २० मार्चच्या महासभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवला आहे. याला मंजुरी मिळाल्यास ३७ हजार चौरस मीटर क्षेत्रफळामध्ये हिंदू समाज - दहन, दफन - ८ हजार, दाऊदी बोहरा समाज -३ हजार, ख्रिश्चन समाज -३ हजार, ज्यु समाज - २ हजार, लिंगायत समाज - २ हजार, अन्य धर्मियांकरीतादेखील मागणीनुसार वापर भविष्यात निश्चित करण्यात येणार असून त्यासाठीदेखील ४ हजार चौरस मीटर जागा ठेवण्यात येणार आहे. याशिवाय पार्किंगसाठी ३ हजार आणि स्मृती उद्यान व बफर झोन यासाठी १० हजार चौरस मीटर, १२ मीटर रुंद रस्त्यासाठी २ हजार चौरस मीटर जागा ठेवण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)