विकासाचे शिवधनुष्य पेलण्याचे पंचम कलानींपुढे मोठे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2018 04:25 AM2018-10-01T04:25:47+5:302018-10-01T04:26:18+5:30

उल्हासनगर महापालिकेच्या सर्वच विभागांत सावळागोंधळ उडाला असून सरकारने प्रतिनियुक्तीवरील अधिकारी दिले नसल्याने विभागांच्या कामात सातत्य राहिले नाही.

Great challenge before Pancham Kalani to overcome the developmental struggle | विकासाचे शिवधनुष्य पेलण्याचे पंचम कलानींपुढे मोठे आव्हान

विकासाचे शिवधनुष्य पेलण्याचे पंचम कलानींपुढे मोठे आव्हान

googlenewsNext

महापौरपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर पंचम कलानी यांनी विकासाचे शिवधनुष्य उचलण्याचा निर्धार व्यक्त केला. शहरातील पाणीटंचाई, कल्याण-अंबरनाथ रस्त्याची पुनर्बांधणी व व्यापाऱ्यांचे पुनर्वसन, विकास आराखडा, डम्पिंग समस्या, भुयारी गटारे आदी अनेक प्रश्नांची उकल करण्यात त्यांची कसोटी लागणार आहे. पंचम कलानी यांना जेमतेम एक वर्षाचा कालावधी मिळणार असल्याने कमी वेळेत जास्तीतजास्त कामे करण्याचे मोठे आव्हान आहे. 
उल्हासनगर महापालिकेच्या सर्वच विभागांत सावळागोंधळ उडाला असून सरकारने प्रतिनियुक्तीवरील अधिकारी दिले नसल्याने विभागांच्या कामात सातत्य राहिले नाही. कनिष्ठ व लिपिक दर्जाच्या कर्मचाºयांवर वर्ग-१ व २ अधिकाºयांची जबाबदारी दिली. मात्र, वादग्रस्त असलेले हे अधिकारी नेत्यांच्या हातातील बाहुले ठरल्याची टीका होत आहे. माजी महापौर मीना आयलानी यांना पालिका प्रशासनावर जरब बसवण्यात अपयश आले. त्यांनी महासभेत दिलेल्या एकाही आदेशाचे पालन आयुक्त गणेश पाटील यांनी केले नाही. असे पक्षातील नगरसेवकच महासभेत बोलून दाखवत होते. एकूणच पालिकेत सावळागोंधळ उडून विकासाची कामे ठप्प पडली आहेत.
शहरात कलानी कुटुंबाचा आदरयुक्त दरारा आहे. त्यांच्या नावाच्या भीतीने अधिकारी कामे करत असतात, असा सर्वांना अनुभव आहे. एका दशकानंतर पुन्हा महापालिकेत पंचम यांच्या रूपाने कलानीराज आले. महापालिका अधिकारी, नागरिक व नगरसेवकांच्या विकासाबाबतच्या आशा उंचावल्या आहेत. पंचम यांनी महापौरपदाची सूत्रे स्वीकारताच शहर विकासाचे आश्वासन दिले. पप्पू कलानी यांच्या सत्ताकाळात सिमेंटचे रस्ते बांधून राज्यात, नव्हे तर देशात आदर्श घालून दिला होता. त्याच पावलावर पाऊल ठेवून शहरातील बहुतांश रस्ते काँक्रिटचे करण्याचा निर्धार पंचम यांनी बोलून दाखवला आहे.
महापालिका आर्थिक संकटात सापडली असून मूलभूत सुखसुविधा, कर्मचाºयांच्या पगारावर पालिकेचे उत्पन्न खर्च होत आहे. शहर विकासासाठी पुरेसा निधी शिल्लक राहत नसल्याने तीन वर्षांत नगरसेवकांना त्यांचा हक्काचा विकास निधी मिळाला नाही. त्यामुळे त्यांच्यात पालिका प्रशासनाविषयी खदखद असून पर्यायी उत्पन्न निर्माण करण्यात पालिका प्रशासनाला अपयश आल्याची ओरड सर्वस्तरांतून होत आहे. शहाड फाटक ते महापालिकेपर्यंतचा मुख्य रस्ता १७ कोटी खर्च करून बांधला. अद्यापही रस्त्याचे काम अनेक ठिकाणी अर्धवट असून रस्त्यात खड्डे व रस्त्यांना तडे गेले आहे. महापालिका अशा कंत्राटदारावर ठोस कारवाई करत नसल्याने नगरसेवकांसह नागरिकांचा पालिका प्रशासनावरील विश्वास उडाल्याचे चित्र आहे.

शहरात होत असलेल्या अशा निकृष्ट कामांना लगाम लावण्याची जबाबदारी पंचम यांच्यावर येऊन पडली आहे. कल्याण ते अंबरनाथ रस्ता रुंदीकरणात ९०० दुकानदार बाधित झाले असून त्यापैकी २२५ पेक्षा जास्त दुकानदार पूर्णत: बाधित आहेत. त्यांना पर्यायी जागा देऊन तीन वर्षांपासून रखडलेल्या रस्त्याची पुनर्बांधणी करावी लागणार आहे. २७९ कोटींची भुयारी गटार योजना, ३०० कोटींची फसलेली पाणीपुरवठा योजना, शहरात एमएमआरडीए व पालिकेच्या ७० ते ८० कोटींच्या निधीतून होत असलेल्या रस्त्यांची बांधणी, कचरामुक्त शहर, डम्पिंगचा प्रश्न, पाणीटंचाई, ठप्प पडलेली आरोग्यसुविधा, बेकायदा बांधकामांवर नियंत्रण, प्रतिनियुक्तीवर अधिकारी, ३६ कोटींच्या निधीतील खेमानी नाल्याचे काम, वालधुनी नदीची स्वच्छता, सपना गार्डन येथील सिंधुभवन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका अद्ययावत करणे, आदी अनेक विकासात्मक कामे कलानी यांना करावी लागणार आहेत.

पर्यायी उत्पन्नाचे स्रोत निर्माण करणे
च्महापालिकेचा मालमत्ताकर व एलबीटीपोटी मिळणारे अनुदान आदी मुख्य दोन उत्पन्नाचे स्रोत आहेत. याव्यतिरिक्त पर्यायी उत्पन्नाचे स्रोत पंचम कलानी यांना निर्माण करावे लागणार आहे.
च्पालिकेच्या टीपी विभागाकडून वर्षाला १५ ते २० कोटींचे उत्पन्न मिळत होते. मात्र, विभागाचे काम अनेक वर्षांपासून ठप्प पडल्याने चांगल्या उत्पन्नाला पालिकेला मुकावे लागले आहे.


विरोधकांना सांभाळण्याची जबाबदारी
च्भाजपातील अंतर्गत विरोध डावलून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी पंचम कलानी यांना महापौरपदी निवडून आणले.
च्भाजपाच्या एका गटासह सतत विरोधी असलेल्या साई पक्षाची मर्जी कायम ठेवण्याची खेळी पंचम यांना खेळावी लागणार आहे. तसेच विरोधी पक्षालाही विश्वासात घ्यावे लागणार आहे.
च् पंचम कलानी यांच्या पाठीमागे सासूबाई, आमदार ज्योती कलानी, ओमी टीमचे प्रमुख ओमी कलानी असल्याने विकासात्मक कामे करण्यात अडचण येणार नाही.

उल्हासनगरची महापौरपदाची निवडणूक चांगलीच गाजली. यानिमित्ताने राजकीय वातावरण ढवळून निघाले. पंचम कलानी यांच्या गळ्यात महापौरपदाची माळ पडली. त्यांच्यापुढे आता शहराचा विकास सर्वांना सोबत घेऊन करण्याचे मोठे आव्हान आहे.

Web Title: Great challenge before Pancham Kalani to overcome the developmental struggle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.