पूरग्रस्त कुटुंबीयांना मिळणार भरीव मदत : देवेंद्र फडणवीस
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2019 11:37 PM2019-07-29T23:37:14+5:302019-07-29T23:37:40+5:30
देवेंद्र फडणवीस : २00५ पेक्षाही जास्त मदत करणार
बदलापूर : शिवसेना आणि भाजपची सत्ता म्हणजे रयतेची सत्ता आहे. शिवरायांना अभिप्रेत असलेली कामे आमचे सरकार करत आहे. सरकारचे सर्व निर्णय जनहितासाठीच घेतले जात आहेत. महापुरात बाधित झालेल्या प्रत्येक कुटुंबाचा संसार उभा करण्यासाठी भरीव मदत करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी येथे दिले.
मुरबाड येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण, नवे पोलीस स्टेशन आणि पोलीस वसाहतीचे उद्घाटन, मुरबाड बसआगार, धान्यसाठवणगृह आणि म्हसा महाविद्यालयाचे भूमिपूजन अशा विविध कार्यक्रमांचा मोठा सोहळा मुरबाडमध्ये आयोजित करण्यात आला होता. यावेळी फडणवीस यांनी २७ जुलैच्या महापुरात ठाणे जिल्ह्यासह बदलापुरातील बाधित कुटुंबीयांना भरीव मदत करण्याचे आश्वासन दिले. २००५ च्या महापुरात जी मदत करण्यात आली होती, त्यापेक्षा जास्त मदत कशी करता येईल, याचा निर्णय शासन घेणार आहे. त्यासाठी स्वतंत्र आदेशदेखील काढले जातील, असे ते म्हणाले. पूरपरिस्थितीत नागरिकांचे जीव वाचवण्यासाठी शासनस्तरावर आम्ही घेतलेले निर्णय हे योग्य ठरले आहेत. पुरात कोणतीही जीवितहानी होणार नाही, याची काळजी सरकारने घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मुरबाडमधील विकासकामांच्या उद्घाटन सोहळ्यात मुख्यमंत्री म्हणाले की, शिवाजी महाराजांचा पुतळा हा ऊर्जा देणारा आहे. केवळ पूजा करण्यापेक्षा नागरिकांनी छत्रपतींना अभिप्रेत असलेले राज्य निर्माण करण्यासाठी हातभार लावण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोरच पोलीस स्टेशन असल्याने पोलीसही आता यातून ऊर्जा घेतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मुरबाड मतदारसंघात काम करताना याठिकाणी नागरिकांना काय हवे आहे, याची कल्पना आमदार कथोरे यांना आहे. त्यामुळे ते शासनाकडे पाठपुरावा करताना तशा पद्धतीनेच मागणी करतात. त्यामुळे त्यांची मागणी शासन नाकारत नसून, त्यामुळे मुरबाड मतदारसंघात मोठ्या प्रमाणात कामे झाली आहेत. एमएमआरडीए क्षेत्रात मुरबाडचाही समावेश केल्याने आता मुरबाडला दुहेरी मदत होणार आहे. पूर्वीचे सरकार एमएमआरडीएच्या माध्यमातून ठाणे जिल्ह्यात केवळ ५०० ते ६०० कोटींची कामे करत होते. मात्र, विद्यमान सरकारच्या काळात एकाच विधानसभा मतदारसंघात ५०० कोटींपेक्षा जास्तीची कामे होतात. एमएमआरडीएचा लाभ खऱ्या अर्थाने ठाणे जिल्ह्याला झाल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी पालकमंत्री एकनाथ शिंदे, खा. कपिल पाटील, आ. किसन कथोरे, निरंजन डावखरे, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर आदी उपस्थित होते.
च्मुरबाडच्या शिवाजी महाराज चौकात उभारण्यात आलेल्या अश्वारूढ पुतळ्याची उंची चौथºयासह ३० फूट असल्याने या पुतळ्याला पुष्पहार घालण्यासाठी अग्निशमन दलाची गाडी मागवण्यात आली होती. उंच शिडीच्या या गाडीच्या मदतीने मुख्यमंत्र्यांनी पुतळ्याला हार अर्पण केला.
च्मुरबाडमध्ये ग्रामीण पोलीस ठाण्याचे उद्घाटन करत असताना मुख्यमंत्र्यांनी या कामाचे कौतुक केले. खाजगी गृहसंकुलाप्रमाणे पोलीस वसाहत आणि पोलीस स्टेशन उभारण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.