डोंबिवली एमआयडीसीत घडले भारद्वाज पक्षाचे दर्शन
By मुरलीधर भवार | Published: January 16, 2023 04:12 PM2023-01-16T16:12:59+5:302023-01-16T16:14:56+5:30
भारतासह सर्वत्र दिसणारा हा पक्षी तांबूस, तपकिरी रंगाचे पंख आणि डोळे लाल असलेला आहे.
डोंबिवली - डोंबिवली एमआयडीसी निवासी भागात आज भारद्वाज पक्षाचे दर्शन घडले. निवासी भागात विविध प्रकारची झाडे असल्याने हिवाळ्यात अनेक पक्षी या झाडांच्या फांद्यावर येऊन बसतातत.
भारतासह सर्वत्र दिसणारा हा पक्षी तांबूस, तपकिरी रंगाचे पंख आणि डोळे लाल असलेला आहे. या पक्षाचे सकाळचे दर्शन शुभकारक असल्याचे मानले जाते. अनेक लोकांचा मनात श्रध्दास्थान असलेला हा कोकीळ प्रजातीतील पक्षी सकाळच कुक - कूक - हुप - हुप असा घुमणारा आवाज काढून सर्वांचे लक्ष वेधून घेत असतो. याला कुंभार कावळा, सोनकावळा, देव/ऋषी कावळा, कुकुटकुंभा आदी नावाने पण ओळखले जाते. याची शेपटी बरीच लांब असते.
साधारण याची एकूण लांबी ४५ सेंमी असते. या पक्षाचे घरटे घुमटाच्या किंवा घड्याच्या आकाराचे असते. त्यात मादी तीन ते पाच अंडी घालते. हा पक्षी मास भक्षक असून किडे, सरडे, गोगलगायी, लहान पक्षांची अंडी, छोटे उंदीर आणि साप आदी खातो. एमआयडीसी भागात असलेल्या झाडावर असे अनेक दुर्मिळ पक्षी वस्ती करून राहत आहेत. महाराष्ट्रात काही ठिकाणी गुढी पाडव्याच्या दिवशी या भारद्वाज पक्षांचे दर्शन घेऊन नव्या वर्षाची सुरुवात करतात.