‘सरस’मधील पारंपरिक वस्तूंना मोठी मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2019 11:57 PM2019-12-28T23:57:24+5:302019-12-28T23:57:26+5:30
चहाच्या कपबशांपासून लहान मुलांच्या पिगी बँक, जेवणाच्या भांड्यांना ग्राहकांची पसंती
ठाणे : कोकणातील सर्व जिल्ह्यांच्या गावखेड्यांमधील बाराबलुतेदारांनी त्यांच्या पारंपरिक व्यवसायाकरिता तयार केलेल्या गृहोपयोगी वस्तू, साहित्य, खाद्यपदार्थ आदींना आधुनिकतेची जोड देऊन ते ठाणे जिल्हा परिषदेच्या जिल्हा ग्रामीण यंत्रणा व कोकण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने नवी मुंबईत सुरू असलेल्या ‘सरस’मध्ये सर्वांसाठी उपलब्ध केले आहे.
यामध्ये चहाच्या कपबशांपासून लहान मुलांच्या पिगी बँक, जेवण करण्याची विविध भांडी अशा असंख्य वस्तूंचा प्रदर्शनात समावेश आहे. पारंपरिक व्यवसायातून मातीची भांडी तयार केली जात आहेत. हा व्यवसाय अनेक पिढ्यांपासून ग्रामीण भागाच्या उरण परिसरात सुरू आहे. ही मातीची भांडी विकण्यासाठी पायाला भिंगरी बांधल्यागत अनेक महिला फिरतात. पण, आता ही नावीन्यपूर्ण भांडी प्रदर्शनात उपलब्ध आहेत. या सरसला भेट देणाऱ्या चोखंदळ ग्राहकांकडून या भांड्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे पूनम हातनोलकर यांनी सांगितले. याप्रमाणेच सांगलीहून आलेल्या आदर्श स्वयंसहायता समूहातील महिलांनी उत्कृष्ट पादत्राणे, बूट सरसमध्ये विक्रीकरिता ठेवले आहेत. उत्तम दर्जाची ही पादत्राणे खरेदी करण्यासाठी ग्राहकांकडून प्रतिसाद मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेले ‘सरस’ ३० डिसेंबरपर्यंत सुरू राहणार आहे.
स्वयंसहायता समूहांचा सहभाग
कोकण, खानदेश, मराठवाडा, विदर्भातून १२० स्वयंसहायता समूह सहभागी झालेत. त्यांना प्रोत्साहन देण्याचे आवाहन विभागीय कोकण महसूल आयुक्त शिवाजीराव दौंड, मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे, प्रकल्प संचालक डॉ. रूपाली सातपुते यांनी केले आहे.