‘त्या’ महाठगाचा प्रकृती अस्वास्थ्याचा बनाव उघड!
By admin | Published: April 5, 2017 05:33 AM2017-04-05T05:33:38+5:302017-04-05T05:33:38+5:30
पोलिसांच्या चौकशीपासून वाचण्यासाठी महाठगाने केलेला प्रकृती अस्वास्थ्याचा बनाव अखेर उघडकीस आला.
ठाणे : पोलिसांच्या चौकशीपासून वाचण्यासाठी महाठगाने केलेला प्रकृती अस्वास्थ्याचा बनाव अखेर उघडकीस आला. व्यापाऱ्यांना सुमारे दीड कोटी रुपयांनी फसविणाऱ्या या ठगाची न्यायालयाच्या आदेशानुसार वैद्यकीय तपासणी केल्यानंतर, मंगळवारी त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली.
वाशी येथील निखिल अग्रवाल याच्यासह तिघांविरुद्ध शीळ डायघर पोलीस ठाण्यात ११ जानेवारी रोजी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मध्य प्रदेशातील व्यापारी संदीप गोयल यांचे जवळपास ७७ लाख रुपयांचे कडधान्य त्याने परस्पर विकल्याचा आरोप त्याच्यावर आहे. पोलिसांनी अग्रवालला अटक केल्यानंतर, ठाणे न्यायालयाने त्याला ३ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते. परंतु, २ एप्रिलला त्याने प्रकृती अस्वास्थ्याचा बनाव केल्याने न्यायालयाच्या आदेशानुसार त्याला ठाण्याच्या शासकीय रुग्णालयात भरती करण्यात आले. तक्रारदार गोयल यांनी यावर आक्षेप नोंदविणारी याचिका ३ एप्रिलला ठाणे न्यायालयात दाखल केली. अॅड. रमेश त्रिपाठी यांनी त्यांची बाजू मांडताना या प्रकरणी गंभीर आरोप केले. व्यापाऱ्यांचा विश्वास संपादन करून त्यानंतर अग्रवाल त्यांची फसवणूक करीत असे. त्याच्याविरूद्ध डायघर, एपीएमसी मार्केट, तळोजा पोलीस ठाण्यासह मध्य प्रदेशात फसवणुकीचे चार गुन्हे दाखल असल्याची माहिती त्यांनी न्यायालयास दिली.
वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी अग्रवालला भरती करून घेण्यास नकार दिला होता. परंतु, आरोपी बळजबरी रुग्णालयात भरती झाला असून, रुग्णालयाच्या दफ्तरी तशी नोंद असल्याचे अॅड. त्रिपाठी यांनी निदर्शनास आणून दिले. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसरा केलेल्या वैद्यकीय तपासणीअंती अग्रवालचा प्रकृती अस्वास्थ्याचा बनाव उघडकीस आला. (प्रतिनिधी)
>न्यायालयात पडला तोंडघशी
फसवणुकीच्या गुन्ह्यात निखिल अग्रवालला ३ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. व्यापाऱ्यांना सुमारे दीड कोटीचा गंडा घालणाऱ्या या महाठगाकडून फसवणुकीची रक्कम वसूल करण्यासाठी त्याची पोलीस चौकशी होणे क्रमप्राप्त होते. परंतु, प्रकृती अस्वास्थ्याचा बनाव करून पोलीस चौकशी टाळण्यात तो यशस्वी झाला. त्याचा हा बनाव न्यायालयासमोर उघड झाला खरा, परंतु पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर. त्यामुळे न्यायालयाने त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली. आरोपी न्यायालयात तोंडघशी पडला असला तरी पोलीस चौकशीचा फास सोडविण्यात तो यशस्वी झाला. महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, गुजरातमधील व्यापाऱ्यांना ठगविणाऱ्या या आरोपीची पुन्हा वैद्यकीय तपासणी करण्याची त्यांची मागणी न्यायालयाने मान्य केली. त्यानुसार आरोपीची वैद्यकीय तपासणी केली असता तो ‘फिट’ असल्याचे आढळले. वैद्यकीय अहवालानंतर मंगळवारी न्यायालयाने त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली.
अदखलपात्र गुन्हा दाखल
तक्रार मागे घेण्यासाठी निखिल अग्रवाल धमक्या देत असल्याची तक्रार संदीप गोयल यांनी ठाणेनगर पोलिसांकडे दिली आहे. त्यानुसार निखिल अग्रवालविरुद्ध अदखलपात्र गुन्हा मंगळवारी नोंदविण्यात आला.