मीरारोडच्या बड्या विकासकाच्या बांधकाम प्रकल्पाची त्रिसदस्य समितीकडून चौकशीचे हरित लवादाचे आदेश
By धीरज परब | Published: November 30, 2022 02:27 PM2022-11-30T14:27:16+5:302022-11-30T14:27:36+5:30
Mira Road: मीरारोड पूर्वेला एव्हरस्माईल प्रा.ली. यांनी सृष्टी , कल्पतरू नावाने मोठ्या वसाहती विकसित केल्या आहेत. त्यांचा सृष्टी सेक्टर -२ (अ) नावाने नवीन गृहनिर्माण प्रकल्पचे बांधकाम सुरु आहे .
मीरारोड - मीरारोडचा नवीन सृष्टी बांधकाम प्रकल्प हा पर्यावरण नियमांचे उल्लंघन करून होत असल्याच्या याचिकेची हरित लवादाच्या पश्चिम खंडपीठाने दखल घेत सिया (महाराष्ट्र पर्यावरण प्रभाव मूल्यांकन प्राधिकरण ), एमपीसीबी ( महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ ) व एमसिझेडिएमए (महाराष्ट्र राज्य सागरी किनारा व्यवस्थापन प्राधिकरण) यांची त्रिसदस्य समिती नियुक्त करून स्वयंस्पष्ट अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत .
मीरारोड पूर्वेला एव्हरस्माईल प्रा.ली. यांनी सृष्टी , कल्पतरू नावाने मोठ्या वसाहती विकसित केल्या आहेत. त्यांचा सृष्टी सेक्टर -२ (अ) नावाने नवीन गृहनिर्माण प्रकल्पचे बांधकाम सुरु आहे . याचिकाकर्ते इरबा कोनापुरे व साबीर सय्यद ह्यांनी हरित लवाद कडे दाखल याचिकेत , मौजे पेणकर पाडा येथील सर्व्हे क्रमांक ६५, ६८, ६९ आदी ठिकाणी सीआरझेड १ व २ मध्ये तसेच उच्चतम भरती रेषा असलेल्या जागेवर महापालिकेकडून बांधकाम परवानगी देण्यात आली आहे.
पालिकेने विकासकाम सीआरझेडची परवानगी घेऊन मग बांधकाम करावे असे कळवले असताना सुद्धा शासनाच्या पर्यावरण विभागाची परवानगी न-घेता विकासकाने बेसमेंट अधिक, तळ, पोडियम अधिक नऊ मजल्याच्या इमारती बांधकाम होत आहेत . याठिकाणी मोठ्या प्रमाणात खोदकाम करण्यात आले तसेच येथील शेकडो झाडे तोडण्याची पालिकेने परवानगी दिली व झाडे तोडली गेली आहेत.
हरित लवादाच्या न्यायाधीश दिनेश सिंह व डॉ. विजय कुलकर्णी यांच्या खंडपीठाने त्रिसदस्य समिती नियुक्तीचे आदेश दिले आहेत . याचिकाकर्त्यांचे वतीने ज्येष्ठ वकील नितीन लोणकर सह ऍड. सोनाली सूर्यवंशी, ऍड. तानाजी गंभीरे यांनी बाजू मांडली .