मलनि:सारण प्रकल्पास सरकारचा हिरवा कंदील
By admin | Published: February 21, 2017 05:28 AM2017-02-21T05:28:50+5:302017-02-21T05:28:50+5:30
अमृत अभियान योजनेंतर्गत राबवल्या जाणाऱ्या मलनि:सारण प्रकल्पांतर्गत केडीएमसीने सादर केलेल्या अहवालास
कल्याण : अमृत अभियान योजनेंतर्गत राबवल्या जाणाऱ्या मलनि:सारण प्रकल्पांतर्गत केडीएमसीने सादर केलेल्या अहवालास राज्यस्तरीय तांत्रिक समितीने मान्यता दिली आहे. १२ सेक्टरमध्ये ही योजना राबवली जाणार आहे. राज्य सरकारने यासंदर्भात परिपत्रक काढले आहे.
अमृत योजनेत राज्यातील ४४ शहरांची निवड झाली आहे. त्यात कल्याण-डोंबिवली शहरेही आहेत. केडीएमसीने सादर केलेल्या प्रकल्प अहवालास राज्यस्तरीय तांत्रिक समितीने ४ जानेवारीला मान्यता दिली. परंतु, कोकण शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे या योजनेच्या मंजुरीचे पत्र महापालिकेला मिळाले नव्हते. ते आता मिळाले आहे.
या योजनेत जेथे मलवाहिन्या नाहीत, अशा भागांमध्ये ८० किलोमीटर मलवाहिन्या आणि १४ पम्पिंग स्टेशन उभारण्यात येणार आहेत. त्यात उंबर्डे, सापार्डे, वाडेघर, कोळवली-गंधारे, लोकग्राम, कचोरे, टिटवाळा, कोपर व मोठागावचा समावेश आहे. या योजनेची मंजूर किंमत १५३ कोटी ३८ लाख रुपये आहे. केंद्र सरकारकडून ५१ कोटी १२ लाख, तर राज्य सरकारकडून २५ कोटी ५७ लाख रुपये अनुदान मिळणार आहे. उर्वरित ७६ कोटी ६९ लाख रुपये महापालिकेला उभे करावे लागणार आहेत. (प्रतिनिधी)