संकरा नेत्रालयाला शासनाचा ग्रीन सिग्नल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2018 02:51 AM2018-04-15T02:51:26+5:302018-04-15T02:51:26+5:30
संकरा नेत्रालयाच्या मार्गातील अखेर सगळे अडथळे दूरझाले असून शासनानेदेखील ठाणे महापालिकेने सादर केलेल्या ठरावाला शुक्रवारी ग्रीन सिग्नल दिला आहे. त्यानुसार, अवघ्या १ रुपये वार्षिक भाडेतत्त्वावर महापालिकेच्या मालकीच्या १.३८ हेक्टर भूखंडावर हे नेत्रालय चालवले जाणार आहे.
- अजित मांडके
ठाणे : संकरा नेत्रालयाच्या मार्गातील अखेर सगळे अडथळे दूरझाले असून शासनानेदेखील ठाणे महापालिकेने सादर केलेल्या ठरावाला शुक्रवारी ग्रीन सिग्नल दिला आहे. त्यानुसार, अवघ्या १ रुपये वार्षिक भाडेतत्त्वावर महापालिकेच्या मालकीच्या १.३८ हेक्टर भूखंडावर हे नेत्रालय चालवले जाणार आहे.
ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी २०१५ च्या सुमारास यासंदर्भातील प्रस्ताव महासभेच्या पटलावर ठेवला होता. परंतु, ४ एकरची जागा ज्याची बाजारभावाप्रमाणे अंदाजे किंमत १०० कोटी असताना ती केवळ एक रुपया नाममात्र भाडेतत्त्वावर देण्याला विरोध करून यात भ्रष्टाचार असल्याचा आरोप त्यावेळेस राष्टÑवादीने केला होता. तशा आशयाचे फलकही शहरभर लावले होते. परंतु, हा प्रस्ताव महासभेत गोंधळात मंजूर झाला. त्यानंतरही विरोधकांनी आपला विरोध लावून धरला होता. अखेर, आयुक्तांनी या नेत्रालयाचा चेंडू ठाणेकरांच्या कोर्टात टाकला होता.
तसेच या ठिकाणी केवळ नेत्रालयच उभे राहणार नसून ट्रेनिंग व रिसर्च सेंटर अशा सुविधा उपलब्ध होणार असल्याचेही स्पष्ट केले होते. परंतु, ठाणेकरांनीदेखील महापालिकेच्या बाजूने कौल देऊन हे नेत्रालय व्हावे, अशी इच्छा व्यक्त केली. तसेच राष्टÑवादीचे दिवंगत नेते वसंत डावखरे यांनीदेखील याला सहमती दर्शवली होती. दरम्यान, ठाणेकरांचे मत घेतल्यानंतर महापालिकेने त्याला शासनाने मंजुरी द्यावी, यासाठी हा ठराव १५ डिसेंबर २०१५ रोजी शासनाकडे पाठवला होता. अखेर, १३ एप्रिल २०१८ रोजी या ठरावाला शासनाने मंजुरी दिली. त्यामुळे आता खऱ्या अर्थाने संकराचा ठाण्यात येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
सशर्त दिली मंजुरी
ठाण्यातील ढोकाळी, एअरफोर्स येथील कलरकेम कंपनीजवळील लोढा येथे १.३८ हेक्टर क्षेत्रफळावर हे नेत्रालय उभारले जाणार आहे. शासनाने या नेत्रालयाला मंजुरी देताना काही महत्त्वाच्या बाबींचा विचार केला जावा, अशा अटींवरच मान्यता दिली आहे. त्यानुसार, या नेत्रालयामार्फत पुरवण्यात येणाºया सेवा अथवा येणाºया शस्त्रक्रिया व इतर वैद्यकीय प्रक्रिया सेवा ४० टक्के रुग्णांना मोफत असतील.
या ४० टक्के रुग्णांची गणना ठाणे महापालिकेच्या कर्मचाºयांना देण्यात येणाºया मोफत सेवांशी करण्यात येऊ नये. महापालिकेच्या रुग्णालयात कार्यरत असलेल्या वैद्यकीय-निमवैद्यकीय अधिकारी-कर्मचारी यांना आवश्यकता असल्यास नेत्रालयाचे व्यवस्थापनाकडून मोफत प्रशिक्षण देण्यात येईल.
- ३० वर्षांनंतर भाडेपट्ट्यास मुदतवाढ द्यायची असल्यास शासनाची फेरमंजुरी आवश्यक राहणार आहे. महापालिकेच्या सर्व अधिकारी, कर्मचाºयांना त्यात मोफत उपचार बंधनकारक असणार आहेत.
- संकरा नेत्रालयाची इमारत, संकुलाची मालकी ठाणे महापालिकेची राहणार, नूतनीकरणाबाबत सद्य:स्थितीमधील शासनाचे धोरण, तसेच तत्कालीन प्रचलित असलेल्या शासनाच्या नूतनीकरण धोरणातील अटी व शर्तीच्या अधीन राहूनच करावे.
- ३० वर्षांच्या मुदतीनंतर भाडेपट्ट्यास मुदतवाढ दिल्यास इमारत, संकुलाचा ताबा हा महापालिकेकडे वर्ग करण्यात येईल, अशा अटींचा समावेश केला आहे.