रेल्वे कॉरिडॉरकरीता हिरवी कत्तल!
By admin | Published: October 30, 2015 11:39 PM2015-10-30T23:39:19+5:302015-10-30T23:39:19+5:30
पश्चिम रेल्वेवरील मुंबई-अहमदाबाद रेल्वे कॉरिडॉर करीता स्थानिकांच्या जमिनीचे संपादन केल्यानंतर प्रकल्पाला अडथळा ठरणारी झाडे तोडण्यात येणार आहेत.
बोर्डी : पश्चिम रेल्वेवरील मुंबई-अहमदाबाद रेल्वे कॉरिडॉर करीता स्थानिकांच्या जमिनीचे संपादन केल्यानंतर प्रकल्पाला अडथळा ठरणारी झाडे तोडण्यात येणार आहेत. बोर्डी वनक्षेत्रातील अठराशे झाडांच्या तोडणीकरीता छापणीचे काम वनविभागाच्या मदतीने पूर्ण झाले आहे. डहाणू ते वसई या पट्ट्यातील कत्तल होणाऱ्या झाडांचा आकडा मोठ्या संख्येने वाढणार आहे.
मुंबई-अहमदाबाद रेल्वे कॉरिडॉरकरीता अडथळा ठरणारी झाडे तोडली जाणार आहेत. याबाबत डहाणू वनविभागातून बोर्डी वनपरिक्षेत्र कार्यालयास तोडीकरीता झाडांना छापणी करण्याचे काम वनक्षेत्रपाल डी. जे. सोनावणे यांच्याकडे सोपविले होते.
यावेळी चिखले, घोलवड, बोरीगाव, ब्राम्हणपाडा, वेवजी इ. गावातील १८०३ झाडावर छापणी प्रक्रिया वनपाल व वनरक्षकांनी पुर्ण केले आहे. त्यापैकी अनुसूचित प्रजातीच्या गटात मोडणारी आंबा, साग, चिंच, खैर अशी ७६५ झाडे असून उर्वरीत बिगर अनुसूचित प्रकारातील झाडे आहेत. सदर रेल्वे कॉरीडॉरकरीता सुमारे दोन हजार झाडे कापली जाणार असतील तर डहाणू ते वसई या पट्ट्यात कत्तल होणाऱ्या झाडांची संख्या अनेक पटीने वाढणार आहे. त्यामुळे पालघर जिल्ह्णातील वनक्षेत्रात घट होऊन पर्यावरणाचे संतुलन बिघडणार आहे. शासनाने विकासाच्या नावाखाली हिरवी कत्तल करण्याचा घाट घातला आहे. तरी तोड होणाऱ्या झाडांच्या दहापट झाडे लावण्याची अट बंधनकारक करावी असे मत पर्यावरण प्रेमींनी मांडले आहे. (वार्ताहर)