ग्रीन झोन झाला तीन दिवसात रेड झोन याला जबाबदार कोण, कोपरीत कोरोनाचे ११ रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2020 03:00 PM2020-04-29T15:00:48+5:302020-04-29T15:01:09+5:30
ठाणे पूर्व हा भाग मागील महिनाभर कोरोनापासून दूर होता. त्यामुळे तो ग्रीन झोन म्हणून पालिकेने घोषीत केला होता. मात्र मागील काही दिवसात या भागात कोरोनाचे तब्बल ११ रुग्ण आढळल्याने हा भाग ग्रीन झोन मधून थेट रेड झोनमध्ये आला आहे.
ठाणे : ठाण्यात लॉकडाऊन घोषीत झाल्यानंतर मागील जवळ जवळ महिनाभर कोपरीत कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नव्हता. मात्र मागील तीन ते चार दिवसात येथे रुग्णांच्या संख्येत अचानक वाढ झाली आणि येथील ग्रीन झोन अचानक पालिकेला रेड झोन म्हणून घोषीत करण्यात आला. त्यातही ग्रीन झोन असतांनाही येथील अत्यावश्यक सेवा बंद ठेवण्यात आल्या होत्या. येथील दोन्ही बाजूच्या सीमाही बाहेरच्यांसाठी बंद ठेवण्यात आल्या होत्या. असे असतांनाही या भागात कोरोनाचा शिरकाव कसा झाला असा प्रश्न आता पालिकेला पडला आहे.
ठाणे शहरात आजच्या घडीला २६० च्यावर कोरोना बाधीत रुग्णांची संख्या झाला आहे. ज्या भागात कोरोना रुग्ण आढळत आहेत, ते भाग पालिकेकडून रेड झोन म्हणून घोषीत करण्यात आले आहे. मागील आठवड्यात लोकमान्य सावरकरनगर भागात बंद करण्यात आला. त्यानंतर दोन दिवसापूर्वी वागळे पटटयात २९ कोरोना बाधीत रुग्ण आढळल्यानंतर तो भागही आता ३ मे पर्यंत पूर्णपणे लॉकडाऊन करण्यात आला आहे. त्यानंतर आता कोपरीही ३ मे पर्यंत पूर्णपणे लॉकडाऊन करण्यात आला आहे. ठाण्याच्या विविध भागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या आढळून येत असतांना कोपरीत मात्र मागील जवळ जवळ महिनाभर कोरोना बाधीत रुग्ण आढळले नव्हते. त्यामुळे मागील १५ दिवसापूर्वी पालिकेने येथील दोन्ही बाजूच्या सीमा बंद केल्या. तसेच नागरीकांना अत्यावश्यक सेवांचा पुरवठा घरोघरी केला जात होता. एवढी सगळी खबरदारी घेतल्यानंतरही कोपरीत अखेर कोरोनाचा शिरकाव झाला आहे. यामध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याला काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. हा कोपरीतील पहिला रुग्ण ठरला होता. त्यामुळे पालिकेने खरबदारीचे उपाय योजन्यास सुरवात केली. हा पोलीस मुंब्रा पोलीस ठाण्यात कार्यरत होता. त्यामुळे इतर ठिकाणाहून हा संसर्ग कोपरीत आल्याची चर्चा होती. परंतु त्यानंतर मागील तीन दिवसात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या थेट ११ वर गेली आहे. मंगळवारी एकाच दिवशीच या भागात ६ कोरोना बाधीत रुग्ण आढळून आले आहेत. त्यातील पाच रुग्ण आनंद नगर झोपडपटटी भागातील असल्याची माहिती पुढे आली आहे.
त्यामुळे पालिकेने आता संपूर्ण कोपरीच येत्या ३ मे पर्यंत लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. ग्रीन झोन असतांना ज्या पध्दतीने नागरीकांना घरपोच अत्यावश्यक साहित्य मिळत होते. तशीच सेवा आताही ठेवली जाणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले. दुसरीकडे केवळ मेडीकल दुकानेच येथे उघडी राहितील असेही पालिकेने स्पष्ट केले आहे. परंतु ग्रीन झोनचा रोड झोन होण्यास येथील काही नागरीकच जबाबदार असल्याची माहिती पुढे येत आहे. येथील काही नागरीक परिसरातून बाहेर गेल्यानेच कोपरीत कोरोनाचा संसर्ग आल्याची माहिती पुढे आली आहे. दरम्यान आता या कोरोना बाधीत रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांना पालिकेने क्वॉरान्टाइन केले आहे. तर ज्या ज्या भागात हे रुग्ण आढळले आहेत, त्या भागांचा सर्व्हे पालिकेच्या माध्यमातून सुरु झाला आहे. तसेच येथील नागरीकांची तपासणीही केली जाणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले.