मालमत्ता कर बद्दलच्या तक्रारींचे दर गुरुवारी केले जाणार निवारण
By धीरज परब | Published: July 9, 2024 06:15 PM2024-07-09T18:15:20+5:302024-07-09T18:15:53+5:30
आयुक्तांनी सुरु केला तक्रार निवारण
लोकमत न्यूज नेटवर्क, मीरारोड - मीरा भाईंदर मधील नागरिकांच्या मालमत्ता कर बाबत असलेल्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी महापालिका आयुक्त संजय काटकर यांनी दर गुरुवारी तक्रार निवारण सप्ताहाची सुरवात केली आहे .
मीरा भाईंदर महापालिकेच्या हद्दीत ३ लाख १५ हजार निवासी तर ५५ हजार वाणिज्य वापराच्या अश्या एकूण ३ लाख ७५ हजार मालमत्ता आहेत. मालमत्ता कर आकारणी पासून क्षेत्रफळात बदल , आकारणी दर वा शुल्क बदल , मालमत्ता हस्तांतरण , नाव वा पत्यात दुरुस्ती, मालमत्ता नसताना कर आकारणी सुरूच ठेवणे आदी विविध कामासाठी नागरिकांना पालिकेच्या खेपा माराव्या लागतात . लहान सहान कामांसाठी सुद्धा अनेकदा नागरिकांची अर्थपूर्ण अडवणूक केली जाते .
ह्या बाबतच्या तक्रारी आयुक्त काटकर यांच्या कानावर आल्या होत्या .महानगरपालिका कार्यक्षेत्रातील मालमत्ता धारकांच्या मालमत्ता कर विषयक दिल्या जाणाऱ्या अधिसुचित सेवा, पारदर्शक, गतिमान व विहित काळ मर्यादित देण्यासाठी तक्रार सप्ताहाचे आयोजन करण्याचा निर्णय आयुक्तांनी घेतला .
८ जुलै रोजी आयुक्तांच्य्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त आयुक्त संभाजी पानपट्टे यांच्या उपस्थितीत मालमत्ता कर विभागामार्फत तक्रार सप्ताह आयोजन करणे कामी आढावा बैठक घेण्यात आली. सदर बैठकीस सहाय्यक आयुक्त मालमत्ता कर विभाग चंद्रकांत बोरसे, सिस्टीम मॅनेजर राज घरत व सर्व कर निरीक्षक उपस्थित होते.
अतिरिक्त आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली दर गुरुवारी शासकीय सुटटीचे दिवस वगळून दुपारी ३ ते ५ या वेळेत महानगरपालिका मुख्य कार्यालय, दुसरा मजला, स्थायी समिती सभागृह येथे मालमत्ता कर तक्रार सप्ताहाचे आयोजन केले जाणार आहे . या तक्रार सप्ताहात मालमत्ता कर आकारणी, नावात व पत्त्यात दुरुस्ती, कर विभागणी, देयकात दुरुस्ती व मालमत्ता कराच्या सबंधित इतर तक्रारींचे निवारण करण्यात येणार आहे.
सदर मालमत्ता तक्रार सप्ताहात नोंदवही तयार करून आलेल्या तक्रारींचे आठ दिवसात निराकरण करून दर गुरूवारच्या बैठकीत केलेल्या कार्यवाहीची माहिती आयुक्त यांना देण्यात येणार आहे. नागरिकांनी आपल्या मालमत्ता कर बाबत तक्रारी असल्यास नियोजित केलेल्या तक्रार सप्ताहासाठी महापालिका मुख्य कार्यालयात दर गुरुवारी दुपारी ३ ते ५ वाजेपर्यंत अर्ज व कागदपत्रासह उपस्थित राहण्याचे आवाहन आयुक्त तथा प्रशासक संजय श्रीपतराव काटकर यांनी सर्व मालमत्ता धारकांना केले आहे.