मैदान खेळांचे की गैरसुविधांचे?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:41 AM2021-04-27T04:41:39+5:302021-04-27T04:41:39+5:30
डोंबिवली : एकीकडे कल्याण-डोंबिवली शहरांची सिग्नल आणि सीसीटीव्ही यंत्रणांच्या माध्यमातून स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरू झाली असताना खेळांच्या मैदानांकडे ...
डोंबिवली : एकीकडे कल्याण-डोंबिवली शहरांची सिग्नल आणि सीसीटीव्ही यंत्रणांच्या माध्यमातून स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरू झाली असताना खेळांच्या मैदानांकडे मात्र केडीएमसी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींचे पुरते दुर्लक्ष झाल्याचे डोंबिवली पूर्वेकडील नेहरू मैदानाची दुरवस्था पाहता स्पष्ट होते. डेब्रिजचे ढिगारे आणि कचऱ्याचा पसारा पाहता हे मैदान खेळाचे आहे की गैरसुविधांचे, असा प्रश्न उपस्थित होतो.
मैदाने खेळाडूंसाठी असली तरी कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या अखत्यारित असलेल्या नेहरू मैदानाची स्थिती पाहता, हे मैदान नव्हे तर कबुतरखाना असल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. यासंदर्भात जागरूक नागरिकांनी वारंवार आवाज उठविल्यानंतरही तसेच मनपाच्या महासभेत प्रशासनावर तोफ डागूनही परिस्थिती जैसे थे आहे. याचबरोबर आता मैदानात एका बाजूला मोठ्या प्रमाणावर डेब्रिजचे ढीग जमा झाले आहेत. एका बाजूला कचरा पडला आहे, तर काही ठिकाणी कचरा जाळलेल्या अवस्थेत आहे. पदपथ तुटलेल्या अवस्थेत असून या ठिकाणी नगरसेवक निधीतून बसवलेल्या ओपन जिमच्या साहित्यालाही गंज चढल्याने दुखापत होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. आधीच या ठिकाणी झालेल्या बांधकामांनी मैदानाचा आकार कमी झाला असताना अस्तित्वात राहिलेल्या मैदानाकडे होत असलेले दुर्लक्ष पाहता खेळाडूंमध्ये संतापाची भावना आहे. या मैदानाच्या तिन्ही बाजूला असलेल्या प्रभागांचे खुशबू चौधरी, राहुल दामले, संदीप पुराणिक हे नगरसेवक भाजपचे आहेत. भाजपचे आमदार रवींद्र चव्हाण यांचे कार्यालयही मैदानानजीक आहे. शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनीही नेहरू मैदानाच्या सुशोभीकरणासाठी ५० लाखांचा खासदार निधी जाहीर केला होता. जॉगिंग ट्रॅक, ओपन जिम, खो-खोसाठी खांब, बॅडमिंटन खेळासाठी जाळी तसेच स्वच्छतागृह आणि इतर सुशोभीकरण आणि इतर सुविधांसाठी हा निधी दिला जाणार होता. परंतू एकूणच या मैदानाची दयनीय स्थिती पाहता केडीएमसीत गेली २५ वर्षे सत्ता उपभोगणाऱ्या या सत्ताधाऱ्यांचा मैदानाकडे कानाडोळा झाल्याचे पाहायला मिळत आहे.
--------------
फोटो आहे