उल्हासनगरातील मैदाने झाली गर्दुल्ल्यांचा अड्डा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:41 AM2021-04-01T04:41:23+5:302021-04-01T04:41:23+5:30
उल्हासनगर : शहरातील व्हीटीसी मैदानाची काही क्रीडा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी स्वच्छता केली असता दारूच्या बाटल्यांचा खच मिळाला. तीच ...
उल्हासनगर : शहरातील व्हीटीसी मैदानाची काही क्रीडा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी स्वच्छता केली असता दारूच्या बाटल्यांचा खच मिळाला. तीच परिस्थिती गोलमैदान व दसरा मैदानाची झाली असून महापालिकेने कारवाई करण्याची मागणी होत आहे.
मैदानात मुलांना खेळता यावे म्हणून कॅम्प नं ४ परिसरातील व्हीटीसी मैदानाच्या साफसफाईसाठी भाजपचे मंडळ अध्यक्ष निलेश बोबडे यांनी पुढाकार घेतला. स्थानिक क्रिकेट क्लब, कबड्डी संघ, गोलंदाज शॉपर, सामना प्रतिष्ठान आदी पदाधिकाऱ्यांच्या सहकार्यातून मैदानाची दोन दिवासांपूर्वी साफसफाई करण्यात आली. यावेळी कचऱ्यासह मैदानातील बसण्याची जागा व स्वच्छतागृह परिसरात दारूच्या बाटल्या आढळल्या. शेजारील क्रीडासंकुल इमारतीत प्रभाग समिती कार्यालय असून त्यामधील बॅडमिंटन कोर्ट संकुलाची दुरवस्था झाल्याचा आरोप बोबडे यांनी केला.
दसरा मैदानाचीही दुरवस्था झाली असून मैदानात सुरक्षारक्षक तैनात नसल्याने सायंकाळनंतर सर्वसामान्य नागरिक मैदानात जाऊ शकत नाही. कारण, मैदानाचा ताबा भुरटे चोर, नशेखोर, गर्दुल्ले, भिकारी घेतात. महापालिका व पोलीस कुठलीही कारवाई करीत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. तसेच शहरातील गोलमैदानामध्ये दारूची पार्टी झाल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
----------------------------------------
नूतनीकरणाची मागणी
महापालिकेने नेताजी, नाना-नानी पार्क, सपना गार्डन, लाल लोई अशा मोजक्याच उद्यानांचे नूतनीकरण केले आहे. इतर उद्याने नूतनीकरणाच्या प्रतीक्षेत असून या उद्यानांचा गैरवापर होत आहे. भूमाफियांचा डोळा असलेल्या उद्यानांची दुरुस्ती व नूतनीकरणाची मागणी होत आहे.