समाजकंटकांच्या चमूने मोर्चाला लावले गालबोट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2018 12:31 AM2018-07-26T00:31:00+5:302018-07-26T00:33:09+5:30

नितीन कंपनीजवळ मराठा आंदोलनाच्या कार्यकर्त्यांनी सकाळपासून रास्ता रोको केला होता.

A group of miscreants set up a campaign | समाजकंटकांच्या चमूने मोर्चाला लावले गालबोट

समाजकंटकांच्या चमूने मोर्चाला लावले गालबोट

Next

ठाणे : नितीन कंपनीजवळ मराठा आंदोलनाच्या कार्यकर्त्यांनी सकाळपासून रास्ता रोको केला होता. या आंदोलनातील प्रमुख कार्यकर्त्यांशी पोलीस सतत संपर्कात होते. तब्बल तीन तासांनंतर पोलिसांनी प्रमुख कार्यकर्त्यांना रस्त्यावरील जमावाला दूर करण्याची विनंती केली. त्यानुसार, प्रमुख कार्यकर्त्यांनी जाऊन जमावाला विनंती केली. मात्र, जमावात घुसलेले समाजकंटक हे मूळ आंदोलकांशी हुज्जत घालू लागले. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात येताच पोलिसांनी ताबा घेतला आणि लाठीमार करून जमावाला पांगवले. यावेळी १८ ते २० वयोगटांतील तरुणांचा एक जमाव पोलिसांना शिवीगाळ करत होता. मारण्याकरिता पुढे धावून येत होता. त्यांनीच मोठमोठे दगड भिरकावून पोलिसांना जखमी केले. जमावातील मुले परस्परांशी हिंदीत बोलत होती. त्यामुळे समाजकंटकांनी मराठा आंदोलनाला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले. त्यापैकी काही तरुणांना पोलिसांनी अटक केल्याने ते सराईत गुन्हेगार आहेत किंवा कसे, ते चौकशीत स्पष्ट होईल.
साडेतीन तास चक्काजाम केल्यानंतर पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी लाठीमार सुरू केला. सुरुवातीला तरुणांचा चमू पळाला. एकाने पोलिसांच्या दिशेने बीअरची बाटली फेकली. भलेमोठे दगड पोलिसांच्या दिशेने मारून तीन पोलिसांना जखमी केले. त्यांच्यापैकी काही तरुण पोलिसांच्या अंगावर जाऊन शिवीगाळ करत होते. एका पोलीस कॉन्स्टेबलला घेरून मारण्याचा प्रयत्न करणार, तोच अन्य पोलीस मध्ये पडल्याने त्याची सुटका झाली. 

रुग्णवाहिकेला दिली मोकळी करून वाट
मुंबई आणि नाशिककडे जाणारी वाहतूक आंदोलनामुळे संपूर्णपणे ठप्प झाली होती. परंतु, असे असतानाही आंदोलनकर्त्यांनी रुग्णवाहिकेला वाट मोकळी करून दिली. येणाऱ्या प्रत्येक रुग्णवाहिकेसोबत आंदोलनातील कार्यकर्ते पुढच्या टोकापर्यंत जाऊन सोडण्याचे काम करत होते. तसेच ‘बेस्ट’मध्ये अडकून राहिलेली महिला व तिच्या मुलासाठीदेखील वाट मोकळी करून दिली.

स्थानिकांनीच पाच जणांना दिले पकडून
नितीन कंपनी येथील छोट्यामोठ्या गल्लीतून पोलिसांवर, खाजगी वाहनांवर दगडफेक होऊ लागताच पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. मात्र, दगडफेक सुरूच राहिल्याने आतापर्यंत इमारतींच्या आडोशाला उभ्या असलेल्या काही सजग ठाणेकरांनी व मूळ मराठा आंदोलकांनी झडप घालून दगडफेक करणाºया त्या तरुणांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. असे पाच जण पोलिसांच्या स्वाधीन केल्याने आता हे नेमके काय षड्यंत्र आहे, ते स्पष्ट होईल, असे मूळ आंदोलकांचे म्हणणे आहे.

पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आंदोलकांमध्ये किसननगर, लोकमान्यनगर, इंदिरानगर येथील तरुणांचा समावेश असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. ज्यांच्याकडून हा हिंसाचार घडला, ते समाजकंटक असल्याचे मराठा समाजाच्या समन्वय समितीकडून सांगण्यात आले.

शहराच्या विविध ठिकाणी सकाळपासून झालेल्या दगडफेकीच्या घटनांत शंभरहून अधिक गाड्यांची तोडफोड करण्यात आली. यामध्ये टीएमटीच्या पंचवीसहून अधिक बसचा समावेश आहे. पोलिसांनी सुमारे पंचवीसहून अधिक आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले.

Web Title: A group of miscreants set up a campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.