गट-गणांच्या लढती होणार बहुरंगी, बहुढंगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2017 02:08 AM2017-12-05T02:08:41+5:302017-12-05T02:08:57+5:30
स्थानिक पातळीवर वेगवेगळ््या पक्षांनी एकत्र येत केलेली युती किंवा आघाडी आणि त्यामुळे राजकारणाचा बदललेला संदर्भ या पार्श्वभूमीवर
ठाणे : स्थानिक पातळीवर वेगवेगळ््या पक्षांनी एकत्र येत केलेली युती किंवा आघाडी आणि त्यामुळे राजकारणाचा बदललेला संदर्भ या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद आणि पाच पंचायत समित्यांच्या निवडणुकीत बहुरंगी लढती होतील, असे चित्र सोमवारी दिसून आले. अर्ज माघारीचा शेवटचा दिवस असल्याने ठाणे जिल्ह्याच्या राजकारणातील बदललेले बहुढंगी रूपही यानिमित्ताने समोर आले. या निवडणुकीत नव्या चेहºयांना अधिक संधी देण्यात आली असून पक्षांतर करणाºयांना प्राधान्य देण्यात आल्याचे रिंगणात उतरलेल्यांच्या नावांवरून दिसून येते. लढतीचे चित्र स्पष्ट झाल्याने मंगळवारपासून ठिकठिकाणी प्रचाराची दंगल सुरू होईल.
शहापुरात तिरंगी लढत
शहापूर : शहापूर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि भाजपात तिरंगी लढत होणार आहे. अपवाद वगळला तर प्रत्येक पक्षाने दिलेले उमेदवार नवखे आहेत. नव्या चेहºयामुळे नेते मंडळींपुढे आव्हान उभे राहण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी जिल्हा परिषदेच्या सर्व जागा लढवत आहे. त्यातील पंचायत समितीच्या चार जागा मित्रपक्षासाठी सोडल्या आहेत. महागाई, नोटाबंदीमुळे झालेला त्रास, शेतकºयांची आत्महत्या, कर्जमाफीतील दिरंगाई आणि एकंदरीत केंद्रातील, राज्यातील सरकारबाबत असलेली नाराजी हे त्या पक्षाच्या प्रचारातील प्रमुख मुद्दे आहेत. राष्ट्रवादीच्या बिरवाडी, चेरपोली, आवाळे या तीन गटातील जागा प्रतिष्ठेच्या आहेत. बिरवाडीत आमदार पांडुरंग बरोरा यांचे चिरंजीव निखिल निवडणूक लढवित आहेत, तर आवळे या गटात आमदारांची बहिण दीपाली झुगरे निवडणूक रिंगणात आहेत. चेरपोली गटातून आटगावचे उपसरपंच संजय निमसे निवडणूक लढवत आहेत. वासिंद आणि सोगाव गटात भाजपाने नव्याने आलेल्याना उमेदवारी दिली आहे. माजी तालुका अध्यक्ष आणि पंचायत समितीचे उपसभापती सुभाष हरड सोगाव गटातून इच्छुक होते. तेथे सुनील धानके या नव्याने भाजपमध्ये आलेल्या उमेदवाराला तिकीट देण्यात आले. त्यामुळे हरड यांनी गटात अपक्ष म्हणून आणि सोगाव गणातून पक्षातर्फे अर्ज भरला होता. मात्र हरड यांना जिप गटातील अर्ज मागे घेण्यास पक्षाने भाग पाडले. नाराज होऊन ते पंचायत समितीच्या गणातून भाजपातर्फे लढणार आहेत. तूर्तास येथील बंडखोरी टळली असली, तरी नव्याने आलेल्या उमेदवाराला जिल्हा परिषदेची उमेदवारी मिळाल्याने प्रत्यक्ष काम करताना हरड आणि त्यांचे समर्थक काय भूमिका घेतात यावर त्यांचे यशापयश अवलंबून आहे. तशीच परिस्थिती वासिंद गटाची होती. तेथे भाजपाने नव्याने आलेले संजय सुरळके यांना उमेदवारी दिली. तेथे निष्ठावान काळूराम धनगर इच्छुक होते. पण त्यांना पक्षाने पाठबळ न दिल्याने त्यांनी अर्ज मागे घेतला. त्यांना मानणारा मोठा मतदार आहे. त्यामुळे येथे नाराजी आहे. कल्याणचे आमदार नरेंद्र पवार यांनी धनगर यांच्या माघारीत शिष्टाई केली.
भाजपा विरुद्ध शिवसेनेत अंबरनाथमध्ये सरळ लढत
अंबरनाथ : अंबरनाथ तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या चार जागांपैकी तीन जागांवर शिवसेना विरुध्द भाजपा अशी सरळ लढत होणार आहे. एका गटात भाजपा विरुध्द राष्ट्रवादी अशी लढत होणार असल्याचे अर्ज माघारीनंतर स्पष्ट झाले. पंचायत सतिमीच्या ८ जागांवर भाजपा विरुध्द शिवसेना अशीच थेट लढत होणार आहे.
पंचायत सतिमीच्या चोण आणि वाडी गणात, तर वाडी या गटासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांच्या अर्जावर न्यायालयात सुनावणीहोणार असल्याने पंचायत समितीच्या दोन आणि जिल्हा परिषदेच्या एका जागेसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत लांबणिवर पडली आहे. उर्वरित जागांवर आज अनेकांनी अर्ज मागे घेतले. शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्रित निवडणूक लढवित असल्याने भाजपाला या युतीशी लढावे लागणार आहे. नेवाळी गटात राष्ट्रवादी आणि भाजपा यांच्यात सरळ लढत आहे.
तेथे शिवसेना-राष्ट्रवादी युतीतर्फे राष्ट्रवादीचे बाळाराम काठवले, तर भाजपाचे श्याम पाटील यांच्यात लढत होणार आहे. चरगांव गटात भाजपाच्या शांताबाई कथोरे आणि शिवसेनेच्या पुष्पा बोराडे यांच्यात लढत होणार आहे आणि वांगणी गटात शिवसेनेच्या दयाबाई शेलार आणि भाजपाच्या साक्षी शेलार यांच्यात लढत होणार आहे. वाडी या गटाच्या उमेदवारी अर्जावर न्यायालयात दावा असल्याने तेथील लढत अद्याप स्पष्ट नाही.
पंचायत समितीच्या चोण गणात भाजपाच्या अनिता भोईर आणि शिवसेनेच्या स्वप्नाली भोईर यांच्यात लढत होणार आहे. चरगाव गणात भास्कर कडाळी आणि शिवसेनेचे बांगारा नागो यांच्यात लढत होणार आहे. नेवाळी गणात शिवसेनेच्या तेजश्री जाधव आणि भाजपाच्या रेखा पाटील यांच्यात सरळ लढत होणार आहे. नाºहेण गणात राष्ट्रवादीचे सुरेश पाटील आणि भाजपाचे अभिमन्यू म्हात्रे यांच्यात सरळ लढत होणार आहे. काराव गणात शिवसेनेच्या अनिता निरगुडा आणि भाजपाच्या गीता भुरबडा यांच्यात सरळ लढत होणार आहे. वांगणी गणात शिवसेनेचे गौतम गोडांबे आणि भाजपाचे अनंता जाधव यांच्यात लढत असली, तरी या ठिकाणी राष्ट्रवादीचे बंडखोर विजय गायकवाड निवडणूक रिंगणात आहेत. तेथेही शिवसेना आणि भाजपातच लढत होणार आहे.
भिवंडीत प्रचारासाठी मुख्यमंत्र्यांना उतरवण्याची तयारी भाजपाने केली आहे. त्यांच्या आणखी सभा त्याच दिवशी मुरबाड किंवा शहापूरमध्ये घेण्याची चाचपणी सुरू आहे. ती रविवारी होण्याची शक्यता आहे. त्याला प्रत्त्युत्तर म्हणून शिवसेनेकडूनही उद्धव ठाकरे यांच्या सभेची चर्चा सुरू होती. मनसेचा जीव कमी असल्याने राज ठाकरे सभा घेण्याची शक्यता नाही. काँग्रेस-राष्ट्रवादीचे कोणते नेते सभा घेणार त्याबाबत अजून चित्र स्पष्ट नाही.
भिवंडीत अटीतटीच्या लढती
भिवंडी : भिवंडीत जागा जरी सर्वाधिक असल्या तरी भाजपा आणि विरोधकांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केल्याने अटीतटीच्या लढती होण्याची शक्यता आहे. शिवसेना-राष्ट्रवादी आणि त्यांना काँग्रेसचे सहकार्य असलेली युती आणि त्यांच्या विरोधात भाजपा-आरपीआय, श्रमजीवी संघटना असे लढतीचे स्वरूप असल्यावर अर्ज माघारीनंतर शिक्कामोर्तब झाले. या निवडणुकीत जिल्हा परिषद गटासाठी ३५ जणांनी माघार घेतल्याने ५४ जण रिंगणात आहेत. पंचायत समितीसाठी ३९ जणांनी माघार घेतली असून ११३ जण रिंगणात आहेत, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. संतोष थिटे व शिवाजी पाटील यांनी दिली. भाजपातील बंडाळी रोखण्यास तालुक्यातील नेतृत्व अपयशी ठरले आहे. काही अल्पसंख्याक मतदारसंघात भाजपाच्या पदाधिकाºयांनी अपक्ष म्हणून अर्ज भरले आहेत. त्यामुळे पक्षात फूट पडण्याची चिन्हे आहेत. श्रमजीवी संघटना कमळ चिन्हावर निवडणूक लढवित असल्याने ती संघटनाही भाजपावासी झाली आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी पक्षांत मातब्बर नेतृत्व नसल्याने उमेदवार स्वत:च्या ताकदीवर निवडणूक लढवित आहेत.
जिल्हा परिषद निवडणुकीत
सर्वप्रथम काँग्रेसने खाते उघडले
भिवंडी : अल्पसंख्याकबहुल असलेल्या खोणी जिल्हा परिषद गटात काँग्रेसतर्फे निवडणूक लढणाºया सगीना नईम शेख यांच्या विरोधातील सर्व उमेदवारांनी सोमवारी माघार घेतल्याने त्या बिनविरोध निवडून आल्या आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसने सर्वप्रथम खाते उघडले. जिल्हा परिषद गटात बिनविरोध उमेदवार निवडून यावा, यासाठी काँग्रेसचे स्थानिक उमेदवार प्रयत्नशील होते. या गटात भाजपा व शिवसेनेने उमेदवार उभा केला नव्हता. या गटात समाजवादी पक्षाने उमेदवार देण्याची तयारी केली होती. मात्र सोमवारी सर्वांनी माघार घेतली. भाजपाविरोधी विचारांच्या पक्षांनी एकत्र येत काँग्रेसला बिनविरोध निवडून देण्याचा निर्णय घेतला, असे सांगण्यात आले.
कल्याणमध्येही थेट लढती रंगणार
कल्याण : तालुक्यातील चार गण सोडून अन्य ठिकाणी शिवसेना-राष्ट्रवादीची युती आहे. तर चार गणांमध्ये शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी यांच्या सरळ लढत होणार असल्याचे चित्र सोमवारी स्पष्ट झाले आहे. मंगळवारपासून निवडणूक प्रचाराचा धुरळा उडण्यास सुरुवात होणार आहे. कल्याण तालुक्यात जिल्हा परिषदेच्या सहा जागांसाठी २५ उमेदवारांनी अर्ज भरले होते. त्यातील १० जणांनी माघार घेतली. आता गटासाठी १५ उमेदवार रिंगणात आहेत. पंचायतीच्या १२ जागांसाठी ४६ जणांनी उमेदवारी अर्ज भरले. त्यापैकी १६ जणांनी माघार घेतली. आता ३० उमेदवार रिंगणात आहेत. कल्याण तालुक्यात राष्ट्रवादी आणि काँग्रेसची आघाडी झालेली नाही. काँग्रेसने पाच जागांवर उमेदवार उभे केले. भाजपाचे वर्चस्व रोखण्यासाठी राष्ट्रवादीने शिवसेनेशी हातमिळवणी केली. पण त्यांच्यात नडगाव, कांबा, खोणी, पिंपरी गणांमध्ये युती झाली नाही. यापूर्वी कल्याणमध्ये राष्ट्रवादी सत्ताधारी होती. भाजपाला रोखण्यासाठी शिवसेनेने मिलेल त्याचे सहकार्य घेतले आहे. स्वबळावर रिंगणात उतरलेल्या भाजपानेही कंबर कसली आहे. कल्याण तालुक्यात भाजपाचे खासदार कपिल पाटील व भाजपाचे आमदार किसन कथोरे यांनी आधीपासूनच फिल्डिंग लावली होती.