पुजाऱ्याचे महिलेसोबत गैरवर्तन; महिलांकडून पुजाऱ्याला बेदम मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2018 10:00 PM2018-08-10T22:00:44+5:302018-08-10T22:05:40+5:30
गैरवर्तन करणाऱ्या पुजाऱ्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात
कल्याण: महिलेशी गैरवर्तन करणाऱ्या पुजाऱ्याला संतप्त महिलांनी चोप दिल्याची घटना कल्याणमधील सूचननाका येथील गणपती मंदिराच्या घडली आहे. गोपाळ तांबे असं या गैरवर्तन करणाऱ्या पुजाऱ्याचं नाव आहे. याप्रकरणी कोळसेवाडी पोलिसांनी पुजाऱ्याविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे.
सूचकनाक्यावरील गणपती मंदिरात गोपाळ तांबे पुजारी म्हणून काम करतो. त्याला त्याठिकाणी बाबा असं संबोधलं जातं. म्हारळ येथे राहणारी एक महिला मानसिक आजारानं त्रस्त होती. तिला कोणीतरी तांबे बाबांकडे जाण्यास सांगितलं. त्यामुळे महिला तिच्या पतीसह गणपती मंदिरात गेली होती. त्यावेळी बाबानं महिलेच्या पतीला बाजारातून फळ घेऊन येण्याची सूचना केली. फळ देवाच्या चरणाजवळ ठेवल्यानं तुझ्या पत्नीला बरं वाटेल, असं तांबेनं सांगितलं. यानंतर महिलेचा पती बाजारात सफरचंद घेण्यासाठी गेला.
पती बाजारात गेल्यानंतर महिला मंदिरात एकटीच होती. यावेळी बाबानं आजारी महिलेला बरं करण्याच्या बहाण्यानं तिच्या अंगावरुन हात फिरवला. हा प्रकार पाहून धास्तावलेल्या महिलेनं मंदिराबाहेर धाव घेतली. तितक्यात महिलेचा पती मंदिराजवळ आला. यानंतर महिलेनं झालेला सर्व प्रकार पतीला सांगितला. या घटनेची माहिती मिळताच काही महिलांनी मंदिरात घुसून पुजाऱ्याला जबर मारहाण केली. पुजाऱ्याच्या धाटक्या मुलीलादेखील महिलांनी चोप दिला. पीडित महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी पुजाऱ्याविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे.