चिंचणीच्या समुद्रकिनाऱ्यावर वाढतेय पर्यटकांची गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2021 11:43 PM2021-03-11T23:43:26+5:302021-03-11T23:43:42+5:30
सुटीच्या दिवशी येतात हजारो नागरिक : चिंतेत भर
लोकमत न्यूज नेटवर्क
डहाणू : निसर्गसौंदर्याने नटलेल्या चिंचणीच्या स्वच्छ आणि सुंदर समुद्रकिनाऱ्यावर कोरोना महामारीच्या काळातदेखील शनिवार तसेच रविवार या सुट्टीच्या दिवशी हजारो पर्यटकांची गर्दी वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. डहाणू तालुक्यातील चिंचणी, वाढवण, वरोर, गुंगवाडा, घाकटी डहाणू, डहाणू, चिखले, आगर, नरपड, बोर्डीपर्यंतच्या हिरवाईने नटलेल्या समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांबरोबरच आबालवृद्ध महिला, मुले आणि कुटुंबेच्या कुटुंबे फेरफटका मारण्यासाठी येत असतात. त्यामुळे हे स्वच्छ सुंदर समुद्रकिनारे पर्यटकांनी गजबजून गेले आहेत. विशेष म्हणजे चिंचणीच्या समुद्रकिनाऱ्यावर शनिवार आणि रविवार या दोन शासकीय सुट्टीच्या दिवशी पालघर, बोईसर, वानगाव, चारोटी, कासा तसेच परिसरातील हजारो लोक मौजमजा करताना दिसत असतात.
चिंचणीच्या समुद्रकिनाऱ्यावर चारचाकी वाहनांना बंदी असतानाही काही तरुण हौशी मंडळी धूम स्टाईलने वाहने चालवीत असतात. तसेच काही मंडळी टिंगलटवाळी आणि स्टंटबाजी करण्यासाठी चारचाकी गाड्या घेऊन समुद्रकिनाऱ्यावर फिरत असल्याचे दिसून येते. अनेक वेळा चिंचणीच्या समुद्रकिनारी अपघातदेखील झाले आहेत. तर अनेक वेळा चारचाकी वाहने समुद्रात वाहून वाळूत रुतून पडल्याच्या घटना घडलेल्या असताना केवळ स्टंटबाजीसाठी अनेकजण समुद्रकिनारी वाहने नेतात. महिनाभरापूर्वी चिंचणी ग्रामपंचायतीने समुद्रकिनाऱ्यावर वाहनांना बंदी घातली होती. परंतु थोड्या दिवसांनी पुन्हा वाहने किनाऱ्यावर फिरताना दिसत आहेत. एका बाजूला शासन गर्दी टाळण्याचे आवाहन करताना दुसरीकडे समुद्रकिनाऱ्यांवर होणारी गर्दी चिंता वाढवणारी आहे.