ग्रोथ सेंटरला २७ गावांचा तीव्र विरोध

By admin | Published: July 24, 2016 03:42 AM2016-07-24T03:42:32+5:302016-07-24T03:42:32+5:30

राज्य सरकारने २७ गावे परिसरात जाहीर केलेल्या १०गावांतील ग्रोथ सेंटरला २७ गावे सर्वपक्षीय हक्क संरक्षण संघर्ष समितीने कडाडून विरोध केला आहे. कोणत्याही परिस्थितीत ग्रोथ सेंटर होऊ

The Growth Center has been intensely opposed by 27 villages | ग्रोथ सेंटरला २७ गावांचा तीव्र विरोध

ग्रोथ सेंटरला २७ गावांचा तीव्र विरोध

Next

चिकणघर : राज्य सरकारने २७ गावे परिसरात जाहीर केलेल्या १०गावांतील ग्रोथ सेंटरला २७ गावे सर्वपक्षीय हक्क संरक्षण संघर्ष समितीने कडाडून विरोध केला आहे. कोणत्याही परिस्थितीत ग्रोथ सेंटर होऊ देणार नाही, अशी कणखर भूमिका शुक्र वारी मानपाडेश्वर मंदिरात झालेल्या संघर्ष समितीच्या तातडीच्या बैठकीत नेत्यांनी जाहीर केली.
या बैठकीला समितीचे अध्यक्ष गंगाराम शेलार, गुलाब वझे, अर्जुन बुवा चौधरी, बळीराम तरे, गजानन मांगरूळकर, नगरसेविका दमयंती वझे व ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी समितीच्या सर्वच नेत्यांनी ग्रोथ सेंटरविरोधात आक्रमक भूमिका घेतली. हे ग्रोथ सेंटर २७ गावांतील ग्रामस्थांसाठी नाही, तर ‘पलावा सिटी’ उभारणाऱ्या बिल्डरांसाठी आहे. ग्रामस्थांच्या जमिनी आरक्षित करून काही बिल्डरांच्या फायद्यासाठी सरकारने ग्रोथ सेंटर आमच्या माथी मारले आहे, अशी टीका केली. कारण भोपर, निळजे येथे हे बांधकाम प्रकल्प आहेत. हेदुटणे हद्दीत ‘पलावा सिटी’ उभी राहत आहे. त्यासाठी ग्रोथ सेंटर असल्याचे नेत्यांनी उपस्थितांना सांगितले.
मागील वर्षी आॅगस्टमध्ये सरकारने काढलेल्या अधिसूचनेनुसार एक हजार ०८९ जमिनींवर भोपर, संदप, उसरघर, घारिवली, माणगाव, हेदुटणे, कोळे, निळजे, काटई आणि घेसर या १० गावांचा ग्रोथ सेंटरमध्ये समावेश आहे. पहिल्या टप्प्यात जेथे बिल्डरांची बांधकामे चालू आहेत, त्या हेदुटणे, कोळे, निळजे, काटई, घेसर या पाच गावांचाच समावेश का करण्यात आला, असा सवालही सभेत उपस्थित झाला.
बिल्डरांनी शेतकऱ्यांच्या जमिनी सरकारच्या रेडीरेकनर दरापेक्षा कमी दराने घेतल्या आहेत, हे येथील ७०० शेतकऱ्यांना प्राप्तिकर विभागाच्या नोटिसा आल्यावर कळले. यामुळे ग्रामस्थांमध्ये असंतोष पसरला असल्याचेही दिसून आले.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काळ्या दगडावरची पांढरी रेघ पुसण्याआधी २७ गावांसाठी स्वतंत्र नगरपालिका स्थापन करण्याचे दिलेले आश्वासन पाळावे. त्यासाठी त्यांना भेटणार असल्याचे नेत्यांनी ग्रामस्थांना सांगितले.
(वार्ताहर)

स्वतंत्र नगरपालिकेचे भिजत घोंगडे कायम ठेवून ग्रोथ सेंटर आमच्या माथी मारणे चुकीचे आहे. याबाबतीत पुढील दिशा सर्वसंमतीने ठरवण्याकरिता बैठक घेण्यात आली.
-चंद्रकांत पाटील, सरचिटणीस, २७ गावे सर्वपक्षीय हक्क संरक्षण संघर्ष समिती

ग्रोथ सेंटर हे स्थानिक शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी नाही. त्यासाठी स्थानिकांच्या जमिनी हडपल्या जात आहेत. चार-पाच दिवसांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहोत. त्यानंतर, आंदोलनाची पुढील दिशा ठरेल.
-गुलाब वझे, उपाध्यक्ष, २७ गावे सर्वपक्षीय हक्क संरक्षण संघर्ष समिती

Web Title: The Growth Center has been intensely opposed by 27 villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.