क्लस्टरबाबत पालकमंत्र्यांनी फसवले

By admin | Published: June 2, 2017 04:57 AM2017-06-02T04:57:21+5:302017-06-02T04:57:21+5:30

केवळ मतांसाठी सत्ताधारी शिवसेनेने ठाण्यासाठी क्लस्टर योजना मंजूर झाल्याची घोषणा करून ठाणेकरांची फसवणूक केली आहे.

The Guardian has deceived the cluster | क्लस्टरबाबत पालकमंत्र्यांनी फसवले

क्लस्टरबाबत पालकमंत्र्यांनी फसवले

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : केवळ मतांसाठी सत्ताधारी शिवसेनेने ठाण्यासाठी क्लस्टर योजना मंजूर झाल्याची घोषणा करून ठाणेकरांची फसवणूक केली आहे. प्रत्यक्षात ठाण्यासाठी ही योजनाच लागू झालेली नसल्यामुळे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणेकरांना फसवले आहे. यामुळे याची नैतिक जबाबदारी स्वीकारून एक तर त्यांनी राजीनामा द्यावा किंवा पावसाळ्यात एखादी इमारत दुर्घटना घडली, तर त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी राष्ट्रवादीचे ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे आणि ठामपाचे विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील यांनी गुरुवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली.
राज्य शासनाने मुंबई उच्च न्यायालयात सादर केलेल्या एका प्रतिज्ञापत्रात केवळ मुंबईतच क्लस्टर योजना लागू असल्याचे म्हटले आहे. यात ठाण्याचा उल्लेख न केल्यामुळे जिल्ह्यातील ठाणे, भिवंडी, नवी मुंबई, उल्हासनगर, केडीएमसी आणि मीरा-भार्इंदर या सर्व मनपा एमएमआरडीए क्षेत्रांमधील धोकादायक आणि जुन्या इमारतीच्या क्लस्टर योजनेचा प्रश्न अधांतरी आहे. ठाण्यात क्लस्टर योजना राबवण्याबाबत साशंकता निर्माण झाल्याचे, परांजपे आणि पाटील म्हणाले.

पावसाळ्यात जीवितहानी झाल्यास पालकमंत्री जबाबदार

ठाण्यासह एमएमआरडीए क्षेत्रात क्लस्टर योजना लागू होणार नसल्याचाही राज्य शासनाच्या प्रतिज्ञापत्रात उल्लेख आहे. शिवसेनेने केवळ होर्डिंग्ज लावून योजना लागू झाल्याचे श्रेय घेतले. राज्याच्या नगरविकास विभागाने जो इम्पॅक्ट असेसमेंट अहवाल दिला आहे. त्यातही ठाण्याचा उल्लेख नाही. ठाणे जिल्ह्यात तर ७२ टक्के रहिवासी हे अनधिकृत चाळी आणि जुन्या इमारतींमध्ये वास्तव्याला आहेत. मग, पावसाळ्यात अशा योजनेअभावी जर जीवितहानी झाली, तर याला पालकमंत्रीच जबाबदार असतील.
ठाणेकरांना इमारतींच्या स्ट्रक्चरल आॅडिटसाठी लाखो रुपये खर्च करावे लागत आहेत. त्यानंतर, दुरुस्ती केल्यावर केवळ पाच वर्षेच त्या इमारतीमध्ये राहता येते. मग, पाच वर्षांनंतर काय, हा प्रश्नही प्रलंबित आहे.

आघाडीची सत्ता असताना आम्ही आमच्याच सरकारविरोधात उपोषण केले होते. मोर्चादेखील काढला होता. त्यानंतर, ठाणे बंद केले होते. त्या वेळी आम्हाला तुम्ही साथ दिली होती. आता क्लस्टरच्या मागणीसाठी पालकमंत्री शिंदे यांनी बंदचे आवाहन करावे; आम्ही त्यांना साथ देऊ, त्या वेळी आम्ही पुढाकार घेतला होता. आता शिंदे यांनी पुढाकार घ्यावा, असेही आवाहन परांजपे यांनी केले.

Web Title: The Guardian has deceived the cluster

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.