टंचाईग्रस्त भागात पालकमंत्र्यांकडून मदतीचा हात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2019 11:29 PM2019-06-06T23:29:40+5:302019-06-06T23:29:49+5:30
आसनगाव : शहापूर तालुक्यात सध्या तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. ही दाहकता पुढील वर्षी भासू नये, म्हणून ठोस उपाययोजना करण्यात ...
आसनगाव : शहापूर तालुक्यात सध्या तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. ही दाहकता पुढील वर्षी भासू नये, म्हणून ठोस उपाययोजना करण्यात प्रशासन कमी पडत असतानाच, ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वत: पुढाकार घेत यंत्रसामग्री स्वखर्चाने ग्रामीण भागात पाठवत तलावातील गाळ काढण्याचे, त्याच्या खोलीकरणाचे काम सुरू केले आहे.
गुरुवारी सकाळी तालुक्यातील माणेखिंड या गावातील तलावाचे काम युवासेना विस्तारक राहुल लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाले. त्यांच्याबरोबर शिवसेनेचे तालुकाध्यक्ष मारु ती धिर्डे व टाकीपठारचे योगी फुलनाथ महाराज उपस्थित होते.
दहा दिवसांपूर्वी पालकमंत्र्यांनी शहापूर तालुक्यातील टंचाईग्रस्त भागांचा दौरा केला होता. ग्रामस्थांशी बोलून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. प्रामुख्याने ग्रामस्थांनी पाणीटंचाई दूर करण्यासाठी साकडे घातले. पाणीसाठा करणाऱ्या तलावातील गाळ उपसून त्याचे खोलीकरण केल्यास पाणी साठेल व पुढील वर्षी टंचाई भासणार नाही, असे ग्रामस्थांनी यावेळी शिंदे यांना सांगितले.
ग्रामस्थांनी केलेल्या मागणीनुसार एका सामाजिक संस्थेने ‘पाणी अडवा-पाणी जिरवा’ या मोहिमेला मदत करण्यासाठी माणेखिंड या गावात स्वखर्चाने पोकलेन, जेसीबी, डम्पर पाठवून तलावातील गाळ काढण्याचे काम सुरू केले. पुढील काही दिवसांत मुरबाड तालुक्यातही तलावाची कामे सुरू करणार आहोत, असे लोंढे यांनी सांगितले.