गोंधळी नगरसेवकांना पालकमंत्री देणार ‘समज’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2017 06:19 AM2017-08-08T06:19:24+5:302017-08-08T06:19:24+5:30

प्रभागातील विकासकामांच्या फाइलींना मंजुरी दिली जात नसल्याने कामे नाहीत, अशी ओरड करत केडीएमसी मुख्यालयात गोंधळ घालणाऱ्या नगरसेवकांना पालकमंत्री एकनाथ शिंदे समज देणार आहेत.

Guardian Minister to confuse Gondhli Municipal Council | गोंधळी नगरसेवकांना पालकमंत्री देणार ‘समज’

गोंधळी नगरसेवकांना पालकमंत्री देणार ‘समज’

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : प्रभागातील विकासकामांच्या फाइलींना मंजुरी दिली जात नसल्याने कामे नाहीत, अशी ओरड करत केडीएमसी मुख्यालयात गोंधळ घालणाऱ्या नगरसेवकांना पालकमंत्री एकनाथ शिंदे समज देणार आहेत. मंत्रालयात नुकत्याच झालेल्या एका बैठकीदरम्यान महापौर राजेंद्र देवळेकर यांनी घडलेला प्रकार पालकमंत्र्यांच्या कानावर घातला. यावर त्यांनी झालेल्या प्रकाराबाबत नाराजी व्यक्त करत तेथे उपस्थित असलेल्या आयुक्त पी. वेलरासू यांनाही विकासकामांबाबत सूचना केल्या.
प्रभागांमध्ये विकासकामे होत नसल्याने ज्यांनी आम्हाला निवडून दिले त्या नागरिकांना रोषाला सातत्याने सामोरे जावे लागत आहे, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे, त्यात कचराही वेळच्यावेळी उचलला जात नाही, रस्त्यातील खड्ड्यांची समस्याही डोकेदुखी ठरत आहे, यासंदर्भात आयुक्तांची भेट घेऊन समस्या मांडण्याचा प्रयत्न केला असता तर आयुक्त वेळ देत नाहीत, याबाबत संताप व्यक्त करत सत्ताधारी असलेल्या शिवसेनेच्या नगरसेवकांनी एक आॅगस्टला महापालिका आयुक्त पी. वेलरासू यांच्या दालनात गोंधळ घालत खुर्च्यांची मोडतोड करण्याचा प्रकार घडला होता. याप्रकरणी देवळेकर वगळता पदाधिकारी आणि नगरसेवक अशा २५ जणांवर बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत.
सत्ताधारी असताना शिवसेनेच्या नगरसेवकांनी छेडलेले आंदोलन चर्चेचा विषय ठरले असून सत्ताही उपभोगायची आणि विरोधकांची भूमिकाही राबवायची ही सत्ताधाºयांची दुटप्पी भूमिका विरोधीपक्षांसाठी देखील टिकेचा मुद्दा ठरली आहे.
दरम्यान, नगरसेवकांनी घातलेल्या गोंधळाची तक्रार देवळेकर यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. मंत्रालयात एका बैठकीला आयुक्त आणि महापौर गेले असताना त्यांनी शिंदे यांना घडलेला प्रकार कथन केला. शिंदे यांनी नाराजी व्यक्त करताना आयुक्तांनाही मोलाच्या सूचना केल्या.

तुमच्याही पाठिशी तसेच उभे राहू!

पुनर्वसन धोरण असो अथवा शहरस्वच्छतेचे उपक्रम यांना गती द्यावी, त्याचबरोबर ज्याप्रमाणे आम्ही ठाण्याचे आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या पाठीमागे उभे आहोत, तसे विकासकामांच्या बाबतीत तुमच्याही पाठीशी उभे राहू, असे त्यांनी आयुक्तांना सांगितले.

प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांनी एकत्र राहून काम केले पाहिजे, ज्या नगरसेवकांनी गोंधळ घातला त्यांनाही समज दिली जाईल, असेही ते म्हणाले.
आयुक्तांना सूचना केल्यानंतर आता शिंदे नगरसेवकांना कशापद्धतीने समज देणार? याकडे लक्ष लागले आहे.

Web Title: Guardian Minister to confuse Gondhli Municipal Council

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.