पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात अनुभवली ‘विंटेज कार’ची सफर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2021 11:47 PM2021-01-27T23:47:16+5:302021-01-27T23:52:43+5:30
ठाण्यात रस्ते सुरक्षा अभियानांतर्गत ठाणे आणि मुंबई वाहतूक पोलीस तसेच रेमंड कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने या विंटेज कार रॅलीचे प्रजासत्ताकदिनी आयोजन केले होते. राज्याचे नगरविकास मंत्री आणि ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या विंटेज कारच्या सफरीचा अनुभव घेतला.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: आपल्या देखण्या प्रभावाची भुरळ पाडणारी मॅकलरेन, फेरारी, लॅम्बोर्गिनी, रोल्स रॉयल्स, बेन्टले, फोर्ड आणि हडसन अशा एकापेक्षा एक नामवंत मोटारी आणि ट्रिम्फ, बीएसए, हार्ले डेव्हिडसन आणि रॉयल इनफिल्ड यासारख्या मोटारसायकलींनी प्रजासत्ताक दिनी ठाणेकरांचे लक्ष वेधले होते. राज्याचे नगरविकास मंत्री आणि ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या विंटेज कारच्या सफरीचा अनुभव घेतला.
प्रजासत्ताक दिनानिमित्त ठाण्यात रस्ते सुरक्षा अभियानांतर्गत ठाणे आणि मुंबई वाहतूक पोलीस तसेच रेमंड कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने या विंटेज कार रॅलीचे प्रजासत्ताकदिनी आयोजन केले होते. या कार्यक्र माप्रसंगी रेमंडचे अध्यक्ष तसेच व्यवस्थापकीय संचालक गौतम सिंघानिया आणि ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर आदी उपस्थित होते. वांद्रे कुर्ला संकुलातून सुरु झालेल्या या सुपर कार ड्राइव्हची सांगता ठाण्यातील रेमंड मैदानावर झाली. त्यानंतर ध्वजारोहणाचा कार्यक्र म झाला. यावेळी बोलताना पालकमंत्री शिंदे म्हणाले की, रस्ते सुरक्षा ही काळाची गरज आहे. ठाण्यातील वाहतूक पोलीस त्यांचे कर्तव्य उत्तम प्रकारे पार पाडत आहेत. परंतू, नागरिकांनीही वाहतूकीच्या नियमांचे काटेकोर पालन करुन आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे. जुन्या मोटारी तसेच काही नामवंत मोटरसायकली या आश्चर्यचकित करणाऱ्या आहेत. ठाणे शहर पोलिसांनी राबविलेल्या या रस्ते सुरक्षा अभियानाचे शिंदे यांनी यावेळी कौतुक केले.
या उपक्र माबद्दल गौतम सिंघानिया म्हणाले की, प्रजासत्ताक दिनी या कार रॅलीचे आयोजन केल्याबद्दल एक मोटारप्रेमी म्हणून आपल्याला नक्कीच ही अभिमानाची बाब आहे. ठाणेकरांसाठी हा एक अविस्मरणीय अनुभव ठरल्याचेही ते म्हणाले. वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांच्यासह अनेक विंटेज कार प्रेमी यावेळी उपस्थित होते.