ठाणे विकासाच्या केंद्रस्थानी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2018 01:28 PM2018-05-01T13:28:52+5:302018-05-01T13:28:52+5:30

ठाणे जिल्हा आता खऱ्या अर्थाने विकासाच्या केंद्रस्थानी आला आहे. मेट्रो, जल वाहतूक, क्लस्टर डेव्हलपमेंट, समृद्धी महामार्ग, जलयुक्त शिवार, शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ आदी विविध प्रकल्पांमुळे जिल्ह्याचा चेहरामोहरा बदलणार

Guardian Minister Eknath Shinde's presentation at the center of Thane Development | ठाणे विकासाच्या केंद्रस्थानी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन

ठाणे विकासाच्या केंद्रस्थानी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन

googlenewsNext
ठळक मुद्देठाणे विकासाच्या केंद्रस्थानीचार वर्षांत विकासाचा अनुशेष भरून काढण्यात यश शहीद जवानांच्या वीरपत्नींना आजीवन विनामूल्य एसटी प्रवासासाठी स्मार्ट कार्डचेही वितरण

ठाणे : गेल्या साडेतीन चार वर्षांत जिल्ह्याच्या विकासाचा अनुशेष भरून काढण्यात यश आल्यामुळे ठाणे जिल्हा आता खऱ्या अर्थाने विकासाच्या केंद्रस्थानी आला आहे. मेट्रो, जल वाहतूक, क्लस्टर डेव्हलपमेंट, समृद्धी महामार्ग, जलयुक्त शिवार, शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ आदी विविध प्रकल्पांमुळे जिल्ह्याचा चेहरामोहरा बदलणार असल्याचे प्रतिपादन ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी येथे केले.

महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त ठाण्यातील साकेत पोलिस मैदानावर  शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. त्याप्रसंगी जिल्ह्यातील जनतेला शुभेच्छा दिल्यानंतर ते बोलत होते. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक पावले गेल्या चार वर्षांत उचलण्यात आली . रखडलेले अनेक प्रकल्पही मार्गी लावण्यात यश आले . बारवी धरणग्रस्तांना संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नोकरीत सामावून घेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे बारवीच्या वाढीव पाणीसाठ्याचा लाभ जिल्ह्यातील बऱ्याच मोठ्या प्रदेशाला होऊन पाणीटंचाईचा प्रश्न निकाली निघणार आहे. तसेच, शहापूर तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांसाठी भावली धरणातून पाणी आणण्याची योजना देखील राबवण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी खासदार कपिल पाटील, आमदार रवींद्र फाटक, उपमहापौर रामचंद्र मढवी, अनंत तरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भिमनवार, पोलिस आयुक्त परमबीर सिंग, पोलिस सहआयुक्त मधुकर पांडे, अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण, अतिरिक्त जिल्हाधिकारी अनिल पवार, पोलिस उपअधीक्षक प्रशांत कदम आदी उपस्थित होते.

शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे, यावर भर देण्यात येत असून पावसाचा प्रत्येक थेंब अडवून रब्बी हंगामात देखील भाजीपाला आणि फळांचे उत्पादन वाढवण्याच्या प्रयत्नांना चांगले यश येत आहे, असे  शिंदे म्हणाले. जलयुक्त शिवारच्या कामांमध्ये जिल्ह्याची कामगिरी उत्तम असून निवड झालेल्या गावांव्यतिरिक्त देखील लोकप्रतिनिधी, लोकसहभाग आणि सीएसआरच्या माध्यमातून जलसिंचनाची कामे हाती घेण्याबाबत जिल्हा प्रशासनाला सूचना देण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. निर्यातक्षम उत्पादनासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याबरोबरच आठवडी बाजारांखेरीज शहरातील गृहसंकुलांमध्ये थेट भाजीविक्रीसाठी शेतकऱ्यांना साह्य करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

यावेळी  शिंदे यांनी पोलिस परेडची पाहाणी केली, तसेच उपस्थित स्वातंत्र्य सैनिक, ज्येष्ठ नागरिक यांच्याशी संवाद साधला. पोलिस महासंचालक यांचे सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्रक शिंदे यांच्या हस्ते देऊन ठाणे पोलिस दलातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. राज्य परिवहन मंडळातर्फे बाळासाहेब ठाकरे शहीद सन्मान योजनेअंतर्गत शहीद जवानांच्या वीरपत्नींना एसटीच्या माध्यमातून आजीवन विनामूल्य प्रवासासाठी स्मार्ट कार्ड देण्याची योजना राबवण्यात येत आहे. या स्मार्ट कार्डचेही वितरण याप्रसंगी  शिंदे यांच्या हस्ते झाले. शहीद जवानांच्या त्यागाची किंमत करता येणे शक्य नाही, परंतु त्यांच्या ऋणातून उतराई होण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे, अशी भावना याप्रसंगी  शिंदे यांनी व्यक्त केली.

शेतकरी बांधवांना डिजिटल स्वाक्षरी सातबारा देण्याच्या उपक्रमाचा शुभारंभही १ मे चे औचित्य साधून  शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील नियोजन भवन येथे आयोजित कार्यक्रमात शासनाच्या या उपक्रमासाठी अहोरात्र संगणकीकरणाचे काम करणारे तलाठी, मंडळ अधिकारी आणि सर्व महसूल अधिकाऱ्यांचे  शिंदे यांनी अभिनंदन केले. याप्रसंगी त्यांचा सत्कार करण्यात आला, तसेच जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांना डिजिटल सातबाराच्या प्रती देण्यात आल्या.

Web Title: Guardian Minister Eknath Shinde's presentation at the center of Thane Development

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.