ग्लोबल हॉस्पिटल येथे सीटी स्कॅन सुविधा सुरू करण्याचे पालकमंत्री शिंदे यांचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:41 AM2021-04-01T04:41:47+5:302021-04-01T04:41:47+5:30
ठाणे : कोविड-१९ ची दुसरी लाट आल्याने शहरात पुन्हा एकदा रुग्णसंख्या वाढू लागली आहे. ही रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी ठाणे ...
ठाणे : कोविड-१९ ची दुसरी लाट आल्याने शहरात पुन्हा एकदा रुग्णसंख्या वाढू लागली आहे. ही रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी ठाणे महापालिका प्रशासनाने सज्ज राहावे, अशा सूचना पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी पालिकेमध्ये झालेल्या विशेष बैठकीत दिल्या. त्याचबरोबर ठाणे ग्लोबल कोविड हॉस्पिटल आणि पार्किंग प्लाझा रुग्णालय येथे तातडीने सीटी स्कॅन सुविधा सुरू करण्याचेही आदेश त्यांनी या बैठकीमध्ये दिले.
गेल्या महिनाभरात कोरोनाबाधित रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या अनुषंगाने कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांसंदर्भात आढावा घेण्यासाठी बुधवारी महापालिकेतील कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात महापौर नरेश म्हस्के यांनी बैठकीचे आयोजन केले होते. पालकमंत्री शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या बैठकीस खासदार राजन विचारे, उपमहापौर पल्लवी कदम, सभागृहनेते अशोक वैती, विरोधी पक्षनेते अशरफ पठाण, आरोग्य समिती सभापती नीशा पाटील आणि शिवसेना गटनेते दिलीप बारटक्के यांच्यासह अतिरिक्त आयुक्त गणेश देशमुख, उपायुक्त संदीप माळवी, अशोक बुरपल्ले आणि विश्वनाथ केळकर आदी अधिकारी उपस्थित होते. कोविडच्या इतर रुग्णांबरोबरच गरोदर महिलांसाठी विशेष व्यवस्था तसेच सहव्याधी रुग्णांची काळजी घेण्याच्या सूचना प्रशासनाला देतानाच मास्क न वापरणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाईचेही आदेश त्यांनी यावेळी दिले.
दरम्यान, गृहविलगीकरणामध्ये असलेल्या व्यक्तींचा नियमित आढावा घेऊन अशा रुग्णांच्या हातावर शिक्का मारून त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेणे आणि जास्तीतजास्त संशयित रुग्ण विलगीकरण कक्षात दाखल होतील, यादृष्टीने महापालिकेने कटाक्षाने कार्यवाही करावी, अशा सूचनाही शिंदे यांनी यावेळी केल्या.
मागील वर्षीपेक्षा यावेळी कोरोना संक्रमणाचे प्रमाण हे जलदगतीने होत आहे. रुग्णांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे, ही बाब चिंताजनक आहे. सर्व प्रशासकीय यंत्रणा आणि लोकप्रतिनिधींनीदेखील सक्षमपणे काम करण्याचे आवाहन यावेळी पालकमंत्र्यांनी केले. यासाठी सुरू केलेले कोविड सेंटर सर्व ताकदीनिशी कार्यान्वित करण्याचे आदेश दिले. या सेंटरमध्ये आवश्यक तज्ज्ञ डॉक्टर्स, औषधसाठा, रेमडीसिविर आणि आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करण्याचेही निर्देश यावेळी त्यांनी दिले.
* याचबरोबर लसीकरण केंद्रे वाढवून जास्तीतजास्त लसीकरण होईल यासाठी प्रयत्न करावेत, यासाठी मनुष्यबळाची संख्या वाढवावी. तसेच होम क्वारंटाइन केलेल्या रुग्णांवर शिक्के मारून तो रुग्ण घराबाहेर पडणार नाही, याबाबत त्यांच्याशी संपर्क साधून आवश्यकतेनुसार वैद्यकीय तपासणी करण्यात यावी, यासाठी तज्ज्ञ डॉक्टर सज्ज करण्यात यावेत. यापूर्वी कार्यान्वित केलेले विलगीकरण कक्ष सज्ज करून या ठिकाणी दैनंदिन साफसफाई, आवश्यक औषधपुरवठा, तज्ज्ञ डॉक्टर्स, भोजनाची व्यवस्था होईल, यादृष्टीने प्रशासनाने काम करावे.
* अधिकारी आणि डॉक्टरांनी २४ तास फोन सेवा सुरू ठेवावी. त्याचवेळी अग्निशमन दलाच्या टँकरने जंतुनाशकाची फवारणीही करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. मास्क न लावणाऱ्यांविरुद्धची मोहीम अधिक तीव्रपणे राबविण्यात यावी. तसेच गर्दीच्या ठिकाणांवर पोलीस आणि पालिका यांनी संयुक्तपणे कारवाईचे आदेशही देण्यात आले आहेत.