पालकमंत्री शिंदे यांचीच प्रतिष्ठा पणाला

By Admin | Published: January 10, 2017 06:36 AM2017-01-10T06:36:52+5:302017-01-10T06:36:52+5:30

कोपरी-पाचपाखाडी या विधानसभा मतदारसंघावर मागील कित्येक वर्षे शिवसेनेचा वरचष्मा राहिला आहे. परंतु, २०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने

Guardian Minister Shinde's reputation is respected | पालकमंत्री शिंदे यांचीच प्रतिष्ठा पणाला

पालकमंत्री शिंदे यांचीच प्रतिष्ठा पणाला

googlenewsNext

अजित मांडके / ठाणे
कोपरी-पाचपाखाडी या विधानसभा मतदारसंघावर मागील कित्येक वर्षे शिवसेनेचा वरचष्मा राहिला आहे. परंतु, २०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने येथे अनपेक्षित मते मिळवल्याने शिवसेनेतील अनेकांच्या भुवया उंचावल्या. वागळे इस्टेट, किसननगर भागात भाजपाने आपली ताकद प्रस्थापित केली असून येथील इंदिरानगर, रूपादेवीपाडा आदी भागांतदेखील भाजपाने आपली बाजू भक्कम केली आहे. साहजिकच, पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिष्ठा या मतदारसंघातील निकालासाठी पणाला लागणार आहे.
२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत पालकमंत्री एकनाथ शिंदे सलग तिसऱ्यांदा याच मतदारसंघातून निवडून आले. त्यांना तब्बल १ लाख १४८ मते, तर भाजपाच्या संदीप लेले यांना ४८ हजार ४१८, काँग्रेसच्या मोहन तिवारी यांना १७ हजार ७८०, मनसेच्या सेजल कदम यांना ८ हजार ५६०, राष्ट्रवादीच्या डॉ. बिपीन महाले यांना अवघी ३ हजार ७०५ मते मिळाली. शिंदे यांना ५१ हजार ७३० एवढे मताधिक्य प्राप्त झाले. परंतु, भाजपाची या भागात हवादेखील नसताना त्यांनी ४८ हजार मते घेतल्याने सेनेच्या वर्तुळात आश्चर्य व्यक्त करण्यात आले. ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत ही मते शिवसेनेला डोकेदुखी ठरू शकतील.
सध्याच्या बदललेल्या राजकीय परिस्थितीचा अंदाज घेतल्यास येथे चारच्या पॅनलचा फायदा घेण्यासाठी अनेकांनी फिल्डिंग लावली आहे. तसेच अनेकांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतर केले आहे. त्यामुळे बदललेल्या या परिस्थितीचा फायदा कोणाला होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरले आहे. मागील २०१२ च्या महापालिका निवडणुकीत काँग्रेसचे ९ नगरसेवक या मतदारसंघातून निवडून आले होते. परंतु, २०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत अनेकांनी शिवसेनेचा भगवा हाती घेतला. त्याचा फायदा आताच्या निवडणुकीत शिवसेनेलाच होणार आहे. गतवर्षी आॅगस्ट महिन्यात झालेल्या पोटनिवडणुकीत वॉर्ड क्र .३२ (अ) मध्ये शिवसेना आणि भाजपाने उमेदवार देऊनही अपक्ष उमेदवार निवडून आला होता. त्यामुळे हा शिवसेनेला धक्का मानला जात आहे. काँग्रेसमधून भाजपामध्ये दाखल झालेले संजय घाडीगावकर यांनी ही जागा निवडून आणली होती. आताच्या घडीला घाडीगावकर यांच्यावरच वागळे पट्ट्याची जबाबदारी दिली आहे.
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसे यांची स्थिती येथे तितकीशी चांगली नाही. सध्याच्या बदललेल्या राजकीय परिस्थितीचा आणि बदललेल्या प्रभागरचनेमुळे काही काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी शिवसेना, भाजपात प्रवेश केला आहे. कोपरीत लक्ष्मण टिकमाणी आणि मालती पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केला, तर भरत चव्हाण यांनी भाजपात प्रवेश केला आहे. याशिवाय, बसपाचे विलास कांबळे यांनीदेखील भाजपात प्रवेश केला आहे. येत्या काळात ही आवकजावक आणखी वाढण्याची चिन्हे आहेत. येथील काही प्रभागांत तर शिवसेनेत कोणाला तिकीट द्यायचे आणि कोणाला नाही, असा पेच निर्माण होणार आहे. त्यात यदाकदाचित युती झाल्यास अनेक ठिकाणी शिवसेनेमध्ये फाटाफूट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे त्याचा फटका शिवसेनेला बसण्याची शक्यता आहे.

Web Title: Guardian Minister Shinde's reputation is respected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.