आमदारांच्या गावात पालकमंत्री भेटीला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2019 11:59 PM2019-05-21T23:59:09+5:302019-05-21T23:59:15+5:30
टँकरने पुरवठा करा : पाच हजार लीटर पाण्याची टाकी दिली
भातसानगर : ‘आमदारांच्या गावाला टँकरने पाणी पुरवठा’ या मथळ्याखाली ‘लोकमत’ने सर्वात आधी वृत्त प्रसिद्ध केले होते. त्याची गंभीर दखल घेत ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी पेंढरघोळ येथे भेट देऊन पाहणी केली. या वेळी प्रशासनातील सर्वच अधिकारी हजर होते. ज्या गावपाड्यांमध्ये पाणी टंचाई निर्माण झाली आहे, ती वस्तुस्थिती ‘लोकमत’ने समोर आणली आहे. त्यामुळे कसारापर्यंतच्या गावपाड्यांत पालकमंत्र्यांनी मंगळवारी भेटी दिल्या. तर विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे हे देखील तालुक्यातील टंचाई निर्माण झालेल्या गावपाड्यांना बुधवारी भेटी देणार आहेत.
शहापूर तालुक्यात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली असून या टंचाईचे चटके तालुक्याचे आ. पांडुरंग बरोरा यांच्या गावालाही बसल्याने या गावाला टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे. याबाबत ‘लोकमत’ने काही दिवसांपूर्वी वृत्त प्रसिद्ध केले होते. त्याची गंभीर दखल घेत पालकमंत्र्यांनी पेंढघोळ या आमदारांच्या गावाला भेट देऊन गावातील समस्या नागरिकांकडून समजावून घेतल्या.
पाणी टंचाईवर मात करण्यासाठी पाच हजार लीटरची सिंटेक्सची टाकी देऊन दररोज या टाकीत एक टँकर पाणी टाकण्याचे निर्देश देण्यात आले. यावेळी आटगाव, पेंढरघोळ ग्रामपंचायतीच्या सरपंच पद्मावती बरोरा, उपसरपंच संजय निमसे, माजी सरपंच भास्कर बरोरा तसेच सर्वच अधिकारी वर्ग यावेळी उपस्थित होता.
तालुक्यातील जवळजवळ दोनशेंहून अधिक गावपाड्यात पाणी टंचाई निर्माण झाली आहे. ३० टँकरने पाणी पुरवठा सुरू असून तोही कमी पडत आहे. प्रत्यक्ष गावांची लोकसंख्या अधिक असल्याने आज जो पाणी पुरवठा केला जात आहे, तो २०११ च्या लोकसंख्येने केला जात आहे. यामुळेच तो कमी पडत असल्याचे नागरिक सांगतात.