पालकमंत्र्यांचा बालेकिल्ला अखेर पूर्णत: बंद, दूध, भाजीपाला आणि मांसविक्रीलाही बंदी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2020 02:14 AM2020-04-27T02:14:39+5:302020-04-27T02:14:57+5:30
२६ एप्रिलच्या मध्यरात्रीपासून ते थेट ३ मेपर्यंत या परिसरातून बाहेर पडणे आणि आत जाण्याला पूर्णपणे बंदी आहे.
ठाणे : जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांचा मूळ मतदारसंघ अशी ओळख असलेल्या वागळे इस्टेट प्रभाग समितीमधील किसननगर, श्रीनगर, सीपी तलाव आणि रोड क्रमांक २२ हा संपूर्ण परिसर पूर्णपणे लॉकडाऊन करण्याचा निर्णय ठाणे महापालिका प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे २६ एप्रिलच्या मध्यरात्रीपासून ते थेट ३ मेपर्यंत या परिसरातून बाहेर पडणे आणि आत जाण्याला पूर्णपणे बंदी आहे. गैरसोय होऊ नये यासाठी थेट नागरिकांच्या घरापर्यंत अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा केला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
ठाणे महानगरपालिकेच्या वागळे इस्टेट प्रभाग समितीमधील किसननगर, पडवळनगर, महाराष्ट्रनगर, श्रीनगर या संपूर्ण परिसरात ४२ कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. कोपरीमध्येही पाच रुग्ण पॉझिटिव्ह मिळाले आहेत. कोपरीमध्ये कोरोनाचा रुग्ण मिळण्यापूर्वीच संपूर्णपणे खबरदारी घेण्यात आली आहे. तिथे अगदी लहान रस्तेही बंद केले आहेत. आता किसननगर परिसरातील कोरोनाच्या वाढत्या रुग्णांची संख्या लक्षात घेऊन हा परिसर लॉकडाऊन करण्यात आला आहे.