पालकमंत्र्यांचा पारा चढला, अंबरनाथमध्ये एकाच प्रभागात सेनेची दोन कार्यालये थाटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2018 06:36 AM2018-04-05T06:36:06+5:302018-04-05T06:36:06+5:30
अंबरनाथच्या नवरेनगर भागात नव्या शिवसेना शाखेचे उद्घाटन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. उद्घाटनासाठी आलेल्या पालकमंत्र्यांना शिवसेना शाळेसमोरच पक्षाचे दुसरे संपर्क कार्यालय पाहायला मिळाले.
अंबरनाथ - अंबरनाथच्या नवरेनगर भागात नव्या शिवसेना शाखेचे उद्घाटन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. उद्घाटनासाठी आलेल्या पालकमंत्र्यांना शिवसेना शाळेसमोरच पक्षाचे दुसरे संपर्क कार्यालय पाहायला मिळाले. एकाच प्रभागात दोन कार्यालये पाहून पालकमंत्री चांगलेच संतापले. उद्घाटनाच्या भाषणातच त्यांनी आपला संताप व्यक्त केला. एकाच प्रभागात दोन कार्यालये सुरू करणे योग्य नाही. कार्यकर्त्यांमध्ये मतभेद असतील, तर कामांमध्ये स्पर्धा करावी. संघटनेत वाद दिसल्यास दोन्ही कार्यालये बंद करीन, असा इशारा दिला. पालकमंत्र्यांच्या या भाषणामुळे दोन्ही गटांतील पदाधिकारी चांगलेच धास्तावले आहेत.
अंबरनाथ शिवसेनेमधील गटबाजी पुन्हा एकदा सर्वांच्याच निदर्शनास आली. शहरातील संघटनेत दोन गट असतानाच आता प्रभागातदेखील शिवसेनेच्या अंतर्गत संघटनेतही दोन गट असल्याचे लक्षात आले. प्रभागातच शिवसेनेने दोन गट तयार केल्याची बाब शिंदे यांच्या निदर्शनास आली. नवरेनगर येथे शाखाप्रमुख रोहित धेंड यांनी नवरेनगर शिवसेना शाखा सुरू केली आहे. या शाखेचे उद्घाटन पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात येणार होते. या कार्यक्रमासाठी शिंदे हे नवरेनगर भागात येताच त्यांचे लक्ष समोर असलेल्या शिवसेनेच्याच दोन कार्यालयांकडे गेले. एकाच प्रभागात दोन कार्यालय असल्याने त्यांनीदेखील या दोन्ही कार्यालयांची माहिती घेतली.
एका बाजूला नव्या शिवसेना शाखेचे उद्घाटन असल्याने ती शाखा रोहित धेंडे यांची असल्याचे सांगण्यात आले. एकाच प्रभागात समोरासमोर दोन कार्यालये थाटली आहेत.
‘गटबाजी खपवून घेतली जाणार नाही’
शहरात असो वा प्रभागात, दोन गट खपवून घेतले जाणार नाही. मतभेद असतील तर आपल्या कामातून स्पर्धा निर्माण करावी. नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी स्पर्धा करावी. मात्र, संघटनेला घातक ठरेल, अशी गटबाजी चालणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. या प्रभागातील दोन कार्यालये सुरू असले, तरी त्यातून नागरिकांची कामे झाली पाहिजेत. अन्यथा, दोन्ही कार्यालये बंद केली जातील, असा इशारा देत शिंदे यांनी कार्यकर्त्यांचा चांगलाच समाचार घेतला. या कार्यक्रमाला खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांच्यासह अनेक नगरसेवक आणि मान्यवर उपस्थित होते.
या कार्यालयासमोर जे शिवसेना संपर्क कार्यालय होते, ते कुणाचे आहे, याची माहिती घेतली असता शिवसेना विभागप्रमुख मिलिंद गाण यांचे असल्याचे सांगण्यात आले.
नव्या शाखेचे उद्घाटन झाल्यावर शिंदे यांनी गाण यांच्या कार्यालयालाही भेट दिली. मात्र, आपला संताप त्यांनी आपल्या भाषणात व्यक्त केला.