पालकांचा आक्रमक पवित्रा : सेंट मेरी शाळेला ठोकले टाळे
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2019 01:23 AM2019-06-27T01:23:37+5:302019-06-27T01:24:08+5:30
फीवाढ आणि अभ्यासक्रमाव्यतिरिक्त लादलेली पुस्तके मागे घेण्यासाठी पालक आणि पूर्वेतील सेंट मेरी शाळा व्यवस्थापनातील संघर्ष शिगेला पोहोचला आहे.
कल्याण : फीवाढ आणि अभ्यासक्रमाव्यतिरिक्त लादलेली पुस्तके मागे घेण्यासाठी पालक आणि पूर्वेतील सेंट मेरी शाळा व्यवस्थापनातील संघर्ष शिगेला पोहोचला आहे. अभ्यासक्रमबाह्य पुस्तके घेतली नाहीत, म्हणून पाल्यांना मारहाण केल्याचा आरोप करत दोन शिक्षकांविरोधात दोन पालकांनी दिलेल्या तक्रारींवरून कोळसेवाडी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. यानंतर, संतप्त पालकांनी बुधवारी सकाळी धाव घेऊ न शाळेला टाळे ठोकले. तसेच सुमारे अडीचशे पालकांनी बेमुदत उपोषण सुरू केले असून मागण्या लेखी मान्य होईपर्यंत शाळेचे टाळे खोलू देणार नसल्याचा इशारा पालकांनी दिला आहे.
आंदोलनात सामाजिक कार्यकर्ते डॉ. सुरेश गवई, नगरसेवक महेश गायकवाड, शिवसेना शाखाप्रमुख प्रशांत गोटे, राजवंती मढवी आदी सहभागी झाले आहेत. कल्याण पूर्वेकडील चक्कीनाका परिसरातील सेंट मेरी शाळेने यंदा केलेली फीवाढ व स्टेट बोर्डाच्या अभ्यासक्रमाव्यतिरिक्त लादलेली पुस्तके मागे घेण्याची पालकांची मागणी आहे. त्यासाठी निवेदने, आंदोलने, साखळी उपोषणासारखे मार्ग अवलंबूनही शाळा व्यवस्थापनाने आश्वासनांवर बोळवण केल्याचा पालकांचा आरोप आहे. दरम्यान, पालकांच्या मागणीची दखल घेतली जात नसल्याने पालकांसह नगरसेवक महेश गायकवाड, नगरसेविका राजवंती मढवी यांनी शाळेबाहेर साखळी उपोषण केले. तेव्हा महापालिकेच्या शिक्षण मंडळाने शिक्षण विभागाने शासनाच्या नियमानुसार स्टेट बोर्डाच्या अभ्यासक्रमाचीच पुस्तके विद्यार्थ्यांना दिली जावीत. इतर बोर्डांच्या अभ्यासक्रमाची सक्ती विद्यार्थ्यांवर नको, असे आदेश दिले होते. त्यानंतर, घेतलेली पुस्तके पालकांनी परत करण्याचा प्रयत्न केला असता शाळा व्यवस्थापन ती घेत नसल्याचा आरोप पालकांनी केला आहे.
दरम्यान, मंगळवारी रात्री आरती चव्हाण आणि वैष्णवी मिश्रा या विद्यार्थ्यांच्या पालकांनी पुस्तके घेतली नाही, म्हणून पाल्यांना मारहाण केल्याचा आरोप करत कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यावरून, श्वेता वाघ व आरती कदम या शिक्षकांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. यानंतर, ज्यांनी पुस्तके घेतली नाही, त्या विद्यार्थ्यांना शाळेत ओरडले जाते, मारले जाते, असा आरोप पालकांनी केला आहे.
विद्यार्थ्यांना मारहाणीचा आरोप चुकीचा!
शाळेचे संचालक भरत मालिक म्हणाले की, आम्ही सरकारच्या नियमाप्रमाणे फीवाढ केली आहे. ५० टक्के पालकांनी ती फी भरली आहे. काहींचा या फीला विरोध आहे. स्टेट बोर्डासोबत मुलांची बुद्धिमत्ता वाढवण्यासाठी इतर बोर्डांची पुस्तके घेण्यास सांगतो. ज्यांना ही पुस्तके हवीत, त्यांनी ती घ्यावी. कुणावरही सक्ती केलेली नाही.
आम्ही खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची भेट घेतली होती, तेव्हा त्यांनी यावर पालकांचे मत घ्यावे, असा सल्ला दिला आहे. हा पेटंट चार वर्षांपासून सुरू आहे. विद्यार्थ्यांना मारहाण केली, हा आरोप खोटा आहे. पोलिसांना आम्ही सीसीटीव्ही फु टेज तपासण्यास सांगितले. त्यात हा प्रकार कुठेही दिसला नाही. केवळ शाळेला बदनाम केले जात आहे.