हुतात्मा जवानांच्या कुटुंबासोबत गुढीपाडवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2019 03:50 AM2019-04-03T03:50:49+5:302019-04-03T03:51:02+5:30
श्री कौपिनेश्वर सांस्कृतिक न्यासतर्फे ज्ञानकेंद्र सभागृहात ही बैठक झाली. सीमेवर लढताना वीरगती प्राप्त झालेले हुतात्मे हे कालांतराने विस्मृतीत जातात.
प्रज्ञा म्हात्रे
ठाणे : हिंदू नववर्षाच्या निमित्ताने काढण्यात येणाऱ्या स्वागतयात्रांदरम्यान ‘एक गुढी हुतात्म्यांच्या कुटुंबीयांसाठी...’ हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. सीमेचे संरक्षण करताना वीरगती प्राप्त झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांमध्ये आनंद वाटण्याचा निर्णय स्वागतयात्रांच्या पूर्वतयारीनिमित्त सोमवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. या उपक्रमांतर्गत स्वागतयात्रा संपल्यानंतर कार्यकर्ते हुतात्मा जवानांच्या घरी जाऊ न गुढी उभारून गुढीपाडवा साजरा करणार आहेत. यावेळी त्यांना मिठाईचेही वाटप केले जाणार आहे.
श्री कौपिनेश्वर सांस्कृतिक न्यासतर्फे ज्ञानकेंद्र सभागृहात ही बैठक झाली. सीमेवर लढताना वीरगती प्राप्त झालेले हुतात्मे हे कालांतराने विस्मृतीत जातात. या हुतात्म्यांच्या कुटुंबीयांसोबत गुढीपाडवा साजरा व्हावा, यासाठी ठाण्यातील हुतात्म्यांची नावे आयोजकांकडे द्यावी, असे आवाहन प्रा. विद्याधर वालावलकर यांनी केले. न्यासाचे पदाधिकारी स्वागतयात्रा संपल्यावर सकाळी ११ वाजता गडकरी रंगायतन येथे गुढी आणि मिठाई घेऊन उभे राहतील. चार ते पाच कार्यकर्त्यांनी हुतात्म्यांच्या घरी जाऊन गुढीपाडवा त्यांच्यासोबत साजरा करावा, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. बैठकीच्या सुरुवातीला विश्वस्त डॉ. अश्विनी बापट यांनी स्वागतयात्रेचा धावता आढावा घेतला. बैठकीला पहिल्यांदाच आलेल्या काही संस्थांनी या स्वागतयात्रेतील आपल्या सहभागाविषयी सांगितले.
हिंदू जागृती समितीतर्फे प्रथमोपचार प्रशिक्षणाची प्रात्यक्षिके दाखविली जाणार आहेत. तसेच, महिलांना स्वसंरक्षणाचे धडे दिले जाणार आहेत. इन्शुरन्सच्या माध्यमातून आपत्ती व्यवस्थापन कसे करावे यावर आधारित चित्ररथ असल्याचे कौस्तुभ कुलकर्णी यांनी सांगितले. गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला आणि स्वागतयात्रेत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे स्वयंसेवक पुरविले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. महिला बाइक रॅलीसाठी आतापर्यंत ३०९ महिलांनी नोंदणी केली असल्याचे मीनल परब कारखानीस यांनी सांगितले. या बाईक रॅलीची ‘१०० टक्के मतदान’ अशी थीम ठेवण्यात आल्याने प्रत्येकाने या आशयाचा फलक आपल्या बाइकला लावावा, असे आवाहन यावेळी केले. या बैठकीला निमंत्रक कुमार जयवंत, अरविंद जोशी, संजीव ब्रह्मे उपस्थित होते.
बैठकीत मांडण्यात आलेल्या सूचना
च्चित्ररथांवरील संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. चित्ररथ आदल्यादिवसापासून सेंट जॉन दि बाप्टीस स्कूलजवळ उभे करावे. या चित्ररथांच्या संरक्षणाची काळजी आयोजक घेतील, असे वालावलकर यांनी सांगितले.
च्नृत्यामुळे स्वागतयात्रा खोळंबू नये यासाठी संबंधित संस्थांनी शिस्त पाळावी अशी सूचना यावेळी करण्यात आली.
च् ज्यांच्या चित्ररथासोबत जास्त लोक असतील त्यांना विशेष पारितोषिक देण्यात येणार आहे.
च्स्वागतयात्रेत ‘श्री राम जय राम जय जय राम’ असा रामनामाचा जप व्हावा अशी संकल्पना विश्व हिंदू परिषदेने मांडली. त्यालाही मान्यता देण्यात आली. पालखी येईपर्यंत सर्व चित्ररथांनी एकाच वेळी हा जयघोष करावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.