‘गँगस्टर्सपेक्षा गुजरातचे माफिया खतरनाक’
By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2019 12:34 AM2019-04-08T00:34:58+5:302019-04-08T00:35:16+5:30
मीरा रोड येथे राष्ट्रवादी काँग्रे्रस आघाडीचे उमेदवार आनंद परांजपे यांच्या प्रचारार्थ आघाडीतील सर्वपक्षीयांचा मेळावा शनिवारी आयोजित करण्यात आला होता.
मीरा रोड : पूर्वी मुंबईतल्या गँगस्टर्सची भीती वाटायची. पण, गुजरातच्या गुन्हेगारीचा आढावा घेतला, तर तिकडचे माफिया यापेक्षाही खतरनाक आहेत, असे सांगत गुजरातचे गृहमंत्री हिरेन पंड्या हत्याकांडातील आरोपी अजूनही सापडले नाहीत. यांच्याबरोबर बसणेसुद्धा धोकादायक आहे, अशा शब्दांत माजी मंत्री गणेश नाईक यांनी भाजप आणि शहा-मोदींवर घणाघाती टीका केली.
मीरा रोड येथे राष्ट्रवादी काँग्रे्रस आघाडीचे उमेदवार आनंद परांजपे यांच्या प्रचारार्थ आघाडीतील सर्वपक्षीयांचा मेळावा शनिवारी आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी नाईक बोलत होते. नोटाबंदीमुळे लोकांचे वाटोळे झाले. उद्या सत्ता गेली की, हे नीरव मोदी, मेहुल चोक्सी यांच्या मार्गाने देश सोडून पळतील. पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान नवाज शरीफ यांच्यासोबत यांचं साटंलोटं होते, असा आरोप नाईक यांनी केला.
काँग्रेसचे माजी आमदार मुझफ्फर हुसेन यांनीसुद्धा मोदी आणि भाजपवर चौफेर हल्ला चढवला. नमो टीव्ही चॅनल, यू-ट्युब चॅनल काढले आहे. अगदी चप्पल, दप्तर आदी वस्तूंचासुद्धा नमो नावाने धंदा सुरू केला असल्याचा आरोप त्यांनी केला. भाजपचे सोशल मीडियाचे नेटवर्क मजबूत आहे. यांची हजारो बेकायदा खाती आहेत. रिलायन्सच्या माध्यमातून मीडिया ताब्यात घेतला असून, मीडिया, वृत्तपत्रांवर दबाव असल्याचे म्हणाले.