मीरा-भाईंदर पालिकेच्या लसीकरण केंद्रांवर गाेंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:46 AM2021-08-18T04:46:59+5:302021-08-18T04:46:59+5:30

मीरा रोड : मीरा-भाईंदर महापालिकेच्या ३३ लसीकरण केंद्रांवर मंगळवारी १८ ते ४४ वयोगटासाठी ऑफलाइन लसीकरण माेहीम राबवण्यात आली. ...

Gundhal at Mira-Bhayander Municipal Corporation's vaccination centers | मीरा-भाईंदर पालिकेच्या लसीकरण केंद्रांवर गाेंधळ

मीरा-भाईंदर पालिकेच्या लसीकरण केंद्रांवर गाेंधळ

Next

मीरा रोड : मीरा-भाईंदर महापालिकेच्या ३३ लसीकरण केंद्रांवर मंगळवारी १८ ते ४४ वयोगटासाठी ऑफलाइन लसीकरण माेहीम राबवण्यात आली. मात्र, महापालिकेचा भोंगळपणा व राजकारण्यांचा हस्तक्षेप यामुळे या केंद्रावर गाेंधळ उडून धक्काबुक्की-रेटारेटी व वादाचे प्रसंग उद्भवले. टाेकन वाटपातील गैरप्रकार आणि बनावट टाेकन यामुळे नागरिकांना लसीपासून वंचित राहावे लागून मनस्ताप व हाल सहन करावे लागले.

मीरा-भाईंदरमध्ये लसीकरण केंद्रांवर नियोजनासह नावनोंदणी, टोकन वाटप यामध्ये गोंधळ झाल्याचे आरोप होत आहेत. राजकारण्यांचा हस्तक्षेप डोकेदुखी ठरत असून, हे आरोप-प्रत्यारोपांचे केंद्र ठरले आहे. आधीचे अनेक अनुभव असूनही राजकारण्यांची लुडबुड थांबलेली नाही. तसेच पालिका प्रशासनही त्याकडे कानाडोळा करीत असल्यामुळे हा गाेंधळ उडाल्याची नाराजी नागरिकांनी व्यक्त केली. शहरातील अनेक लसीकरण केंद्रांवर लस घेण्यासाठी नागरिकांनी मध्यरात्रीपासून रांगा लावल्या होत्या. मात्र यानंतरही अनेकांना लसीपासून वंचित राहावे लागले. भाईंदरच्या नाझरेथ शाळेतील लसीकरण केंद्रावर बनावट टोकन घेऊन असलेल्या एकाला पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. तर त्याच्यासोबतच्या काही महिला व अन्य पळून गेले.

भाईंदरच्या विनायकनगर लसीकरण केंद्रात तर काही राजकीय लोकांनी स्वतःचे टोकन देऊन त्यांची नावे आधीच नोंदवून घेतली. लोकांना आत सोडायचे कामही हीच राजकीय मंडळी करत होती. येथेही गर्दी होऊन रेटारेटी झाली. पालिकेच्या लसीकरण प्रमुख डॉ. अंजली पाटील, प्रभारी मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रकाश जाधव, भाईंदरचे पोलीस अधिकारी घटनास्थळी आले असता हा बनावट टोकन प्रकार पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी निदर्शनास आणून दिला. काही टोकनही ताब्यात घेतले होते. काही महिलांनी टाेकनसाठी ५०० रुपये मागितल्याचा आरोप केला. मीनाताई ठाकरे लसीकरण केंद्र, सेंट झेवियर शाळा केंद्र आदी ठिकाणांवरूनही टोकनबाबत तक्रारी होत्या.

मीरा रोडच्या बाणेगर शाळा केंद्रात सकाळी ७ वाजता गेलेल्या प्रेरणा ओझा या विद्यार्थिनीच्या पुढे रांगेत जेमतेम ३० जण होते. पण तिचे नाव १११ व्या क्रमांकावर नोंदवले गेले आणि टोकनचा क्रमांक १३५ वा मिळाला. सकाळपासून घरातून उपाशी निघालेल्या प्रेरणाला ३ वाजता लस मिळाली, असे तिच्या आई संगीता ओझा यांनी सांगितले. लसीकरण केंद्रात टोकनमध्ये गैरप्रकार होत असल्याचा हा प्रकार बंद करा, अशी मागणी त्यांनी केली. डोंगरी येथील पालिका लसीकरण केंद्रांवर राई-मोरवा गावातील ग्रामस्थांनी रांग लावली म्हणून स्थानिक लोकांनी त्यांना लस देण्यास विरोध केला. त्यावरून वाद निर्माण झाला, असे रांगेतील नागरिकाने सांगितले.

काेट

विनायकनगर लसीकरण केंद्रांवरील टोकनबाबत अहवाल मागवला आहे. नाझरेथ येथे एकास पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. अन्य केंद्रांवरूनसुद्धा तक्रारी आल्या असून, आयुक्तांकडे सविस्तर अहवाल सादर करून त्यांच्या आदेशानुसार कार्यवाही केली जाईल.

- डॉ. अंजली पाटील, लसीकरण प्रमुख

-----

नागरिकांचे आंदाेलन

पेणकरपाडा येथील पालिका लसीकरण केंद्रांवर कित्येक तास रांग लावूनही लस न मिळाल्याने नागरिकांनी लस मिळत नाही तोपर्यंत घरी जाणार नाही, असे सांगत आंदोलन सुरू केले. बोगस लोकांना लस मिळाली; पण आम्हाला का नाही, असा सवाल त्यांनी केला. त्यांनी बनावट टाेकनच्या माध्यमातून लस देण्यात आल्याचाही आराेप केला.

Web Title: Gundhal at Mira-Bhayander Municipal Corporation's vaccination centers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.