बंदुकीच्या धाकानं १ कोटी ८६ लाखांचा ऐवज लंपास; परिसरात भीतीचं वातावरण

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2020 10:57 PM2020-01-31T22:57:45+5:302020-01-31T22:59:25+5:30

राहत्या घरात महिलेचे हातपाय बांधून बंदुकीच्या धाकानं चोरी

gunman robbed house in bhiwandi looted 1 crore 86 lakh | बंदुकीच्या धाकानं १ कोटी ८६ लाखांचा ऐवज लंपास; परिसरात भीतीचं वातावरण

बंदुकीच्या धाकानं १ कोटी ८६ लाखांचा ऐवज लंपास; परिसरात भीतीचं वातावरण

Next

भिवंडी: भिवंडी तालुक्यातील काल्हेर येथे गुरुवारी सकाळी सव्वा सहा वाजेच्या सुमारास चार दरोडेखोरांच्या टोळक्याने जगदीश बळीराम पाटील यांच्या घरात शिरून त्यांच्या कुटुंबियांना बंदुकीचा धाक दाखवून, घरातील आई व मुलाला दोरीने बांधून ठेवून 60 लाखांच्या रोख रकमेसह 1 कोटी 26 लाख 30 हजार रुपयांचे 421 तोळे सोन्याचे दागिने असा एकूण 1 कोटी 86 लाख 30 हजारांचा ऐवज दरोडेखोरांनी लुटून नेल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. या दरोड्याचा गुन्हा दाखल होताच स्थानिक नारपोली पोलिसांसह गुन्हे शाखा या गुन्ह्याच्या तपासासाठी कामाला लागल्या आहेत.

काल्हेर येथील गोदाम व्यावसायिक जगदीश बळीराम पाटील यांची ठाणे भिवंडी रस्त्यालगत बी.सी.अपार्टमेंट ही इमारत असून तिच्या पहिल्या मजल्यावर ते आपल्या पत्नी वंदना, मुलगा शुभम, मुलगी पल्लवी व वयोवृद्ध आई इंदिरा यांच्यासोबत राहत आहेत. जगदीश पाटील हे सकाळी मॉर्निंग वॉकसाठी सहा वाजता घराबाहेर पडले. त्यावेळी त्यांनी नेहमीप्रमाणे फक्त दरवाजा ओढला. त्यावेळी ते बाहेर पडताच त्यांच्यावर पाळत ठेवून असलेले चौघे लुटारू इमारतीच्या जिन्यावरून चढून त्यांनी घराचा दरवाजाचे आतील कुलूप उघडून लुटारु घरात शिरले. लुटारूंनी घरात प्रवेश करताच पत्नी वंदना व मुलगी पल्लवी झोपलेल्या खोलीत ते शिरले व दोघींना जगदीश पाटील यांना ठार मारू अशी धमकी देत पत्नी वंदनाचे हात दोरीने बांधून मुलीस कपाटाचे लॉकर उघडण्यास सांगून त्यामध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने व रोख रक्कम ताब्यात घेतले. त्यानंतर मुलगा शुभम झोपलेल्या खोलीत लुटारूंनी मोर्चा वळवला. त्यावेळी शुभम झोपेतून जागा होताच त्याचे सुद्धा हात दोरीने बांधून तेथील कपाटातील सर्व ऐवज काढून घेऊन अवघ्या 20 मिनिटातच घरातील 60 लाखांची रोकड व 1 कोटी 26 लाख 30 हजार रुपये किंमतीचे 421 तोळ्यांचे सोन्याचे दागिने आदी ऐवज घेऊन लुटारूंनी पोबारा केला आहे. 

घटनेची माहिती मिळताच नारपोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मालोजी शिंदे हे पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल झाले व लुटून नेलेला मुद्देमाल पाहता घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे व वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल होऊन श्वान पथक, ठसे तज्ञ आदींच्या पथकांना घटनास्थळी पाचारण केले. या प्रकरणी शुभम पाटील याने दाखल केलेल्या तक्रारीवरून नारपोली पोलीस ठाण्यात बंदुकीचा धाक दाखवून जबरी चोरी केल्याप्रकरणी चौघा लुटारुंच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

दरम्यान या गुन्ह्यातील आरोपींच्या तपासासाठी ठाणे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्या आदेशाने सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन कौसडीकर यांच्या नेतृत्वाखाली आठ तर गुन्हे शाखा भिवंडी, ठाणे, खंडणी विरोधी पथक अशी एकूण बारा पथके नेमण्यात आली असून काल्हेर परिसरातील सर्व सीसीटीव्हीचा तपास घेऊन आरोपींचा शोध सुरू केला असल्याची माहिती पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे यांनी दिली आहे.

Web Title: gunman robbed house in bhiwandi looted 1 crore 86 lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :theftचोरी