तोफा थंडावल्या, उद्या मतदान; ठाण्यातील तीनही मतदारसंघांत दुरंगी लढत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2019 11:42 PM2019-04-27T23:42:29+5:302019-04-27T23:43:02+5:30
प्रशासन सज्ज, अखेरच्या दिवशी उमेदवारांची तारांबळ, मतदारांच्या भेटीगाठी
ठाणे : ठाणे, कल्याण आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघांसाठी २९ एप्रिल रोजी मतदान होत असून, युती आणि आघाडीमध्ये तीनही मतदारसंघांत लढत होणार आहे. सोमवारी होणाऱ्या मतदानासाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज असून, कडेकोट बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी, शनिवारी तीनही मतदारसंघांत उमेदवारांची सायंकाळी ५ वाजेपर्यंत प्रचारासाठी चांगलीच तारांबळ उडाली.
ठाणे लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे राजन विचारे हे दुसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांची लढत ही राष्ट्रवादीचे आनंद परांजपे यांच्याशी होत आहे. मागील काही दिवस त्यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांमुळे प्रचारात चांगलीच रंगत आली होती.
कल्याण लोकसभा मतदारसंघात शिवसेनेतर्फे श्रीकांत शिंदे हे दुसºयांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून, त्यांची लढत राष्ट्रवादीचे उमेदवार बाबाजी पाटील यांच्याशी होत आहे. या ठिकाणी मागील काही दिवसांपासून जातीच्या आणि आगरीकार्डच्या मुद्यावर प्रचार तापला होता. भिवंडीत भाजपचे कपिल पाटील हेसुद्धा दुसºयांदा रिंगणात उतरले आहेत. त्यांची लढत काँग्रेसचे माजी खासदार सुरेश टावरे यांच्याशी होत आहे. या मतदारसंघात आगरी, कुणबी मते निर्णायक असून, पाटील यांच्या विरोधातील वातावरणामुळे निवडणुकीत रंगत आली आहे. या मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचे प्रा.डॉ. अरुण सावंत हेदेखील रिंगणात असून, त्यांची मते निर्णायक ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मोदी सरकार संपूर्ण प्रचाराचे केंद्रबिंदू राहिले. भाजपने मोदी सरकारच्या यशोगाथा, तर काँग्रेस-राष्टÑवादी आघाडीने अपयशाचे पाढे मतदारांसमोर वाचले. यावेळी प्रचारात फारशी आक्रमकता नव्हती. उलटपक्षी, मतदारांच्या गाठीभेठी व कॉर्नर मीटिंगवर उमेदवारांनी भर दिला.
निवडणुकीचा प्रचार शनिवारी संध्याकाळी संपला. अखेरचा दिवस असल्याने उमेदवारांची मतदारांच्या गाठीभेठीसाठी तारांबळ उडाली होती. आता मतदानापर्यंत मूक प्रचार होणार असून, मतदारांच्या घरोघरी वचननामा, जाहीरनामा पोहोचवण्याचे कामही पूर्ण झाले आहे. आता जिल्ह्यातील ६२ लाख २५ हजार १९४ मतदारांचा कौल मिळवण्याचा प्रयत्न तीनही मतदारसंघांतील उमेदवारांकडून केला जाणार आहे.
मतदान वेळ सकाळी ७ ते सायं. ६ पर्यंत
मतदानाची वेळ सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत आहे. मतदानकेंद्रांत ६ वाजेपर्यंत रांगेत असणाऱ्या प्रत्येक मतदाराला मतदानकेंद्रांतील अधिकारी कूपन देतील. ज्यांच्याजवळ कूपन असेल, त्यांचे मतदान होईपर्यंत मतदानाची प्रक्रिया सुरू राहील.