गुरुपौर्णिमेनिमित्त घडणार गुरू-शिष्य आभासी भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 04:25 AM2021-07-22T04:25:04+5:302021-07-22T04:25:04+5:30
ठाणे : गुरुपौर्णिमेनिमित्त गुरू-शिष्य आभासी भेट घडविण्याचा आगळावेगळा उपक्रम सरस्वती मंदिर ट्रस्टने आयोजिला आहे. यानिमित्त सरस्वती सेकंडरी स्कूलचे माजी ...
ठाणे : गुरुपौर्णिमेनिमित्त गुरू-शिष्य आभासी भेट घडविण्याचा आगळावेगळा उपक्रम सरस्वती मंदिर ट्रस्टने आयोजिला आहे. यानिमित्त सरस्वती सेकंडरी स्कूलचे माजी विद्यार्थी आपल्या लाडक्या शिक्षकांना अर्थात गुरूंना यानिमित्ताने भेटून वंदन करणार आहेत. जुन्या वास्तूतील रोमांचकारक क्षणांची आठवण नव्याने जागवल्या जाणार असून, या आठवणी जागवण्यासाठी २५ जुलै रोजी रात्री ८ ते ९ वाजेदरम्यान ही आभासी भेट आयोजिली आहे.
७ आणि ८ एप्रिल २०१८ ला सरस्वती सेकंडरी स्कूलच्या माजी विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेच्या जुन्या वास्तूला कृतज्ञतापूर्वक प्रेमाने निरोप दिला होता. शाळेची जुनी वास्तू केवळ दगड- विटांनी बनलेली एक इमारत नव्हती, तर कर्वे बाई आणि टिळक सरांपासून शाळेतील प्रत्येक माजी शिक्षक, सेवक आणि विद्यार्थी यांच्या मनोमिलनातून उभारलेले सरस्वतीचे मंदिर होते. आज जुन्या वास्तूतील संस्कार, सकारात्मक भावना आणि निष्ठा जागवत, नवीन वास्तू मोठ्या दिमाखात त्या जागी उभी आहे. शाळेचे विद्यार्थी सप्त खंडात वास्तव्य करीत आहेत. या सर्वांच्या सोयीनुसार या कार्यक्रमाची वेळ ठरवण्यात आली आहे.
या गुरू-शिष्य आभासी पद्धतीने होणाऱ्या भेटीच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे माजी मुख्याधापक आणि कार्यकारी विश्वस्त अशोक टिळक भूषविणार आहेत, तसेच अनेक माजी विद्यार्थीप्रिय शिक्षक उपस्थित राहून आपल्या लाडक्या विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमास शाळेला आणि विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यासाठी जगातील विविध भागांत वास्तव्य करीत असणारे पुढील दिग्गज मराठी व्यक्ती आवर्जून उपस्थित राहणार आहेत. डॉ. विजय जोशी- ऑस्ट्रेलिया, डॉ. अनिल नेने- इंग्लंड, हेरंब कुलकर्णी- फिनलंड, आनंद गानू- अमेरिका, विद्या जोशी- अमेरिका, मुग्धा पेंडसे- अमेरिका, आदी आवर्जून सहभागी होणार आहेत, असे सरस्वती मंदिर ट्रस्ट, ठाण्याचे कार्यकारी विश्वस्त सुरेंद्र दिघे यांनी सांगितले. या आभासी समारंभास शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी आवर्जून उपस्थित राहावे, तसेच आपल्या सहयोगी मित्र-मैत्रिणींना पण सामील करून घ्यावे, असे आवाहन शाळेच्या वतीने केले गेले आहे. माजी विद्यार्थ्यांनी आपली उपस्थिती शाळेच्या ९००४१३५४८५ या क्रमांकावर कळवावी. त्याप्रमाणे संबंधित लिंक पाठवली जाईल, असे शाळेच्या वतीने सांगण्यात आले आहे.