आजच्या पिढीचा गुगल हाच गुरू : योगशिक्षक श्रीकृष्ण म्हसकर यांची नाराजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2019 12:25 PM2019-07-18T12:25:48+5:302019-07-18T12:27:24+5:30
आचार्य अत्रे सांस्कृतिक मंडळातर्फे गुरूपौर्णिमेनिमित्त एका व्याख्यानाचे आयोजन केले होते.
ठाणे : पुर्वी गुरूकुल ही परंपरा होती. त्यात गुरू हा शिष्याला पारखत असे. शिष्य हा गुरूकुलमधून ज्ञानाचे स्नान करुनच बाहेर पडत. परंतू आजच्या पिढीचा गुगल हाच गुरू झाला आहे अशी नाराजी योगशिक्षक श्रीकृष्ण म्हसकर यांनी व्यक्त केली. अत्रे कट्ट्यावर गुरूपौर्णिमेनिमित्त गुरूपरंपरा या विषयावर म्हसकर यांचे व्याख्यान आयोजित केले होते.
शिक्षक हा गुरू असतो म्हणूनच त्याला गुरू मानतो. प्रत्येक सजीव आणि निर्जीवात गुरूध्वनी असतो आणि गुरूध्वनीमधून शिष्य तयार होतो. अज्ञानाचा अभाव म्हणजे ज्ञान पण त्या ज्ञानाची अनुभूती गुरू देतो. शिक्षक हात धरुन चालतो म्हणून तो पथदर्शक असतो पण गुरू हा गुरु परंपरा हा शब्द काय आहे हे सांगतो. आई ही सगळ््या पहिला गुरू असते. गुरू आतून माया करतो आणि बाहेर धपाटा घालतो म्हणूनच गुरू हा कुंभारासारखा असतो. अर्जुनाने गुरूमध्ये सगुणता तर एकलव्याने गुरूत निगुर्णता पाहिली. म्हणून अर्जुनावर अहंकार झाला. अहंकाराची सावली आली तर व्यर्थ होते असेही म्हसकर म्हणाले. साधक, साध्य आणि साधना ही त्रिपुटी चालू ठेवण्याचे जो काम करतो तो म्हणजे गुरू. गुरू आणि शिष्याचे ध्येय वेगवेगळे असते. गुरू जे करतो ते तो कधी सांगत नाही परंतू शिष्य हा तो कोणाचा गुरू आहे हे सांगतो. गुरूत्व हे चराचरात आहे. ग्रहांमध्ये गुरू हा सगळ््यात मोठा ग्रह आहे, त्याकडे आपण आदरानेच बघतो. गुरूपौर्णिमा ही एक दिवस साजरी करुन चालणार नाही, रोजच हा दिवस छोट्या मोठ्या गोष्टींतून साजरा झाला पाहिजे असे आवाहन म्हसकर यांनी केले.