पं. राम मराठे यांच्या नावाने ठाण्यात गुरुकूल व्हावे : पं. सुरेश तळवलकर
By प्रज्ञा म्हात्रे | Published: December 1, 2023 10:13 PM2023-12-01T22:13:54+5:302023-12-01T22:14:09+5:30
ही साक्ष जीवनात आम्हाला खूप शिकवत असते आणि त्यामुळे आम्ही समृद्ध होत असतो असेही ते म्हणाले.
ठाणे: पं. राम मराठे यांच्या नावाचे गुरुकुल ठाण्यात सुरु व्हावे कारण त्यांनी आम्हा कलाकारांना भरभरुन दिले आहे, अफाट गायकी दिली आहे अशी अपेक्षा तालयोगी पद्मश्री पं. सुरेश तळवलकर यांनी व्यक्त केली. त्यांचा कार्यक्रम रात्री नऊ वाजता सुरू होत आणि पहाटे ५ वा. संपत असे. त्यांना ही ऊर्जा त्यांच्या गुरुंकडून मिळत असते. साथसंगत करणारा कलाकार हा गाणे सादर करणारा कलाकार आणि रसिक यांचा मध्यस्थ असतो. तो प्रेक्षकांच्या प्रतिसादाचा साक्षीदार असतो. ही साक्ष जीवनात आम्हाला खूप शिकवत असते आणि त्यामुळे आम्ही समृद्ध होत असतो असेही ते म्हणाले.
ठाणे महानगरपालिकेतर्फे आयोजित करण्यात येणारा संगीतभूषण पं. राम मराठे संगीत महोत्सवाचे पहिले पुष्प शुक्रवारी गडकरी रंगायतन येथे गुंफण्यात आले. यावेळी ज्येष्ठ गायक पं. अजय पोहनकर यांच्या हस्ते पं. तळवलकर यांना संगीतभूषण पं. राम मराठे स्मृती राज्यस्तरीय तसेच निषाद बाक्रे यांना संगीतभूषण पं. राम मराठे स्मृती युवा पुरस्काराने गौरविण्यात आले. प्रसंगी परिवहन समितीचे सभापती विलास जोशी, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, प्रशांत रोडे, उपायुक्त उमेश बिरारी आदी उपस्थित होते. यावेळी पुरस्काराला उत्तर देताना पं. तळवलकर म्हणाले की, खूप वर्षे मी पं. राम मराठे यांना संगत केली आणि त्यांच्या नावाचा पुरस्कारासाठी माझी निवड केली याबद्दल ठाणे महानगरपालिकेचे आभार मानतो.
त्यांच्या नावाचा महोत्सव होतोय यातच मला समाधान आहे. राम भाऊंना मी जवळून पाहिले आहे. त्यांना ऐकताना १५ गवईंना एकत्र ऐकण्याचे समाधान मिळत असे. असे अफाट व्यक्तिमत्त्व मला जवळून अनुभवता आले हे मी कधी विसरू शकत नाही. या पुरस्कारामुळे मी धन्य झालो आहे. पं. बाक्रे म्हणाले की, शास्त्रीय संगीताचा प्रवास करताना सत्त्व परिक्षा घेतली जाते. या प्रवासादरम्यान, एक व्यक्ती प्रवास करत असते पण त्या अवतीभवती अनेक लोक असतात. त्या एका व्यक्तीला आत्मविश्वास तर अवतीभवती असणाऱ्यांना विश्वास असतो. हा विश्वास ठेवणाऱ्या लोकांचे कौतुक म्हणजे हा पुरस्कार आहे.