ठाण्यात रंगणार गुरूवर्य स. वि. कुलकर्णी गौरव व्याख्यानमाला, यंदाचे व्याख्यानमालेचे रौप्य महोत्सवी वर्षे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2019 04:57 PM2019-12-10T16:57:14+5:302019-12-10T16:59:51+5:30
सामाजिक उद्बोधन व प्रबोधन क्षेत्रासाठी वाहिलेली ही लोकाभिमुख व्याख्यानमाला ठाणेकर नागरिकांससाठी वैचारिक पर्वणी ठरते.
ठाणे : सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालय, ठाणे राष्ट्रीय सेवा योजना आयोजित गुरूवर्य स. वि. कुलकर्णी गौरव व्याख्यानमालेचे पुष्प यंदा ज्येष्ठ शास्त्रज्ञ सुहास नाईक साटम आणि तृतीयपंथी श्रीगौरी सावंत गुंफणार आहेत. येत्या शुक्रवार १३ डिसेंबर आणि शनिवार १४ डिसेंबर रोजी ही व्याख्यानमाला आयोजित केली आहे अशी माहिती आयोजन समितीचे सचिव प्रा. डॉ. प्रदीप ढवळ यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.
सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालय, ठाणे राष्ट्रीय सेवा योजना आयोजित गुरूवर्य स. वि. कुलकर्णी गौरव व्याख्यानमालेला यंदा २५ वे वर्षे पुर्ण होत आहे. सायं. ५. ३० वा. महाविद्यालयाच्या प्रांगणात ही व्याख्यान माला संपन्न होणार आहे. साटम हे चंद्रयान २ आणि श्रीगौरी सावंत या मला काही सांगायच आहे या विषयांवर बोलणार आहे. यात किन्नर म्हणून जगताना त्यांच्या आयुष्यात आलेले चढ उतार जनतेसमोर मांडणार आहेत. ही व्याख्यानमाला मुलाखतीच्या स्वरुपात असेल असे ढवळ यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे औचित्य साधून महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचा स्वयंसेवक आणि ठाणे शहराचे महापौर नरेश म्हस्के यांचा सत्कार करण्यात येणार आहे. तसेच, व्याख्यानमालेच्या पहिल्या दिवशी १३ डिसेंबर रोजी आदर्श शिक्षक पुरस्कारही प्रदान करण्यात येणार आहे. कै. सरलाताई चिटणीस यांच्या नावाने दिला जाणारा आदर्श शिक्षक पुरस्कार पुर्व प्राथमिक विभागाला १ आणि प्राथमिक विभागाला एक, स्वातंत्र्यसेनानी दत्ताजी ताम्हाणे यांच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापकाला एक आणि वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापकाला एक तसेच, ज्ञानसाधना महाविद्यालयाच्यावतीने महाविद्यालयातील कनिष्ठ महाविद्यालयातील आणि वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापकाला एक असे सहा पुरस्कार म्हस्के यांच्या हस्ते प्रदान केले जाणार आहे. या पत्रकार परिषदेला यावेळी महाविद्यालयाचे अध्यक्ष सतिश प्रधान, सचिव कमलेश प्रधान, खजिनदार सतिश सेठ, प्राचार्य डॉ. चंद्रशेखर मराठे, अशोक चिटणीस उपस्थित होते.