भिवंडीत 65 लाखांचा गुटखा जप्त , अन्न सुरक्षा विभागाची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2020 04:48 PM2020-08-06T16:48:51+5:302020-08-06T16:49:53+5:30
भिवंडीच्या दिशेने येणाऱ्या तीन ट्रकमधील 280 गोण्यात असलेला 65 लाख 78 हजार रुपय किमतीचा विमल सुगंधित पान मसाला व गुटखा व 36 लाख रुपयांचे तीन ट्रक ताब्यात घेत कारवाई केली आहे.
भिवंडी- महाराष्ट्रात सुगंधी तंबाखू व गुटखा विक्रीस प्रतिबंध असतानाही शेजारील गुजरात राज्यातून विविध मार्गे कोट्यवधी रुपयांचा गुटखा , पान मसाला महाराष्ट्रात विक्री केला जात असून, ठाणे येथील अन्न सुरक्षा पथकाने भिवंडी तालुक्यातील खारबाव येथे रात्रभर पाळत ठेवून तीन ट्रकमधून भिवंडीच्या दिशेने येणाऱ्या तीन ट्रकमधील 280 गोण्यात असलेला 65 लाख 78 हजार रुपय किमतीचा विमल सुगंधित पान मसाला व गुटखा व 36 लाख रुपयांचे तीन ट्रक ताब्यात घेत कारवाई केली आहे.
ठाणे अन्न सुरक्षा विभागाचे सहाय्यक आयुक्त भूषण मोरे यांना गुप्त बातमीदारामार्फत भिवंडी शहराच्या दिशेने गुजरात येथून तीन ट्रक मधून गुटखा व सुगंधित तंबाखू येत असल्याची माहिती समजली असता अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त अरुण उन्हाळे व कोकण विभाग सह आयुक्त शिवाजी देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा निरीक्षक माणिक जाधव, एस एम वधारकर ,एम एम सानप ,ए डी खडके या पथकाने खारबाव येथे एका धाब्यावर रात्रभर पाळत ठेवून गुरुवारी पहाटेच्या सुमारास पंधरा पंधरा मिनिटांच्या अंतराने आलेले तीन आयशर ट्रक अडवून त्यांची चौकशी केली असता त्यामध्ये 280 गोणी विमल सुगंधित पान मसाला व तंबाखू गुटखा आढळून आला.
या कारवाईत ट्रक चालक मोहम्मद आदिल व उदल यादव या दोघांना ताब्यात घेतले आहे . मात्र तिसरा ट्रक चालक अंधाराचा फायदा घेवून पसार झाला या तिन्ही ट्रक मधून 65 लाख 78 हजार रुपयांचा गुटखा व 36 लाख रुपयांचे तीन ट्रक असा एकूण 1 कोटी 1 लाख 78 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करीत त्यांच्या विरोधात भादवी कलम 272,273,188,328 सह अन्न सुरक्षा मानके कायदा 2006 चे कलम 59 अंतर्गत भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .