गुटखा बेतला? तलावात बुडून तरुणाचा मृत्यू, रुग्णालयात सुरू होते उपचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2017 01:48 AM2017-11-14T01:48:08+5:302017-11-14T01:48:17+5:30
केडीएमसीच्या येथील क्रीडासंकुलातील तरणतलावात शरद परिहार (२२) याचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. रविवारी तो रात्री बुडाल्याने बेशुद्ध पडला होता.
डोंबिवली : केडीएमसीच्या येथील क्रीडासंकुलातील तरणतलावात शरद परिहार (२२) याचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. रविवारी तो रात्री बुडाल्याने बेशुद्ध पडला होता. त्याला उपचारासाठी एमआयडीसी निवासी परिसरातील खाजगी रुग्णालयात दाखल केले होते. परंतु, सोमवारी दुपारी १२ च्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. त्याने गुटख्याचे सेवन केले होते. तेच त्याच्या जीवावर बेतल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत मानपाडा पोलीस ठाण्यात नोंद झालेली नव्हती.
शरद हा कल्याण पूर्वेकडील कोळसेवाडी भागातील रहिवासी होता. रविवारी रात्री ८ च्या सुमारास तो मित्रासमवेत क्रीडासंकुलातील तलावात पोहण्यासाठी आला होता. त्याने तलावात उडी मारली, परंतु तो पुन्हा वर आलाच नाही. ही बाब तेथील जीवरक्षकांच्या निदर्शनास येताच त्यांनी तत्काळ तलावात उडी मारून शरदला पाण्याबाहेर काढले. तो बेशुद्ध पडल्याने त्याला कृत्रिम श्वासोच्छ्वास देण्याचा प्रयत्नही झाला. परंतु, ते निष्फळ ठरले. या वेळी शरदला उलटीही झाली. यात त्याने खाल्लेला गुटखा बाहेर पडला.
बेशुद्ध पडलेल्या शरदला उपचारासाठी एमआयडीसी परिसरातील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, त्याचा सोमवारी दुपारी १२ च्या सुमारास मृत्यू झाला, अशी माहिती क्रीडासंकुलातील तरणतलावातील व्यवस्थापकांकडून देण्यात आली. तरणतलावात सात जीवरक्षक तैनात असून दोन प्रशिक्षक आहेत.
दरम्यान, शरद याच्या मृत्यूमुळे एकच खळबळ उडाली आहे.