राज्यात बंदी तरी ठाण्यात सहज मिळतो गुटखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2020 01:31 AM2020-11-28T01:31:04+5:302020-11-28T01:31:23+5:30
वर्षभरात १२ कोटी २२ लाखांचा गुटखा जप्त : सिल्वासामार्गे भिवंडीत येतो गुटखा
जितेंद्र कालेकर
ठाणे : राज्यात राज्यात सर्वत्र गुटखा, सुगंधित पानमसाला तसेच सुगंधित तंबाखू आणि चांदीचा वर्ख असलेल्या सुपारीला बंदी आहे. तरीही, ठाणे शहरासह जिल्हाभर गुटखा आणि पानमसाला चोरी चोरी चुपके चुपके विकला जात असल्याची बाब ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीत समोर आली. अन्न व औषध प्रशासन विभागानेही गेल्या वर्षभरात १२ कोटींचा माल जप्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली. ठाणे शहरात येणाऱ्या गुटख्याबाबतची पडताळणी केली असता यात अनेक बाबी समोर आल्या.
ठाणे अन्न व औषध प्रशासनाने जानेवारी ते १५ नोव्हेंबर २०२० या कालावधीमध्ये जिल्हाभर पोलिसांच्या माहितीवरून १६ तसेच प्रशासनाच्या ४७ अशा ६३ धाडी टाकल्या. यात १२ कोटी २२ लाख ४१ हजारांचा गुटखा आणि सुगंधित तंबाखू जप्त केली. ५१ गुन्हे दाखल झाले असून ४७ दुकाने सील केली, तर २७ वाहने जप्त केली आहेत. यात जप्त केलेल्या वाहनांचा पुढे लिलाव केला जातो.
जानेवारी ते १५ नोव्हेंबरपर्यंत झालेल्या कारवाया
ठाणे - ०४
ऐरोली - 02
नवी मुंबई - 01
भिवंडी - 06
कल्याण - 19
उ.नगर - 04
भाईंदर - 10
एकूण - 63
१० ते २५ रुपये दर
प्रस्तुत प्रतिनिधीने खोपट, राबोडी, मुंब्रा आणि वागळे इस्टेट येथील पानटपऱ्यांवर गुटख्याची मागणी केली. तिथे गुटखा तसेच त्यासोबत तंबाखूची छोटी पुडीही देण्यात आली. यामध्ये लहान पुडी १० तर मोठी पुडी २५ रुपयांमध्ये उपलब्ध होती.
जिल्ह्यात गुजरातमधून गुटखा
गुजरातच्या वापी तसेच सीमेवरील सिल्वासा येथून ठाणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात हा गुटखा येतो. भिवंडीतील दापोडे गावात ट्रेलरमधून तो उतरविण्यात येतो. तिथून तो छोट्या टेम्पोमधून जिल्हाभरातील दुकानांमध्ये वितरीत केला जातो. एखाद्या टपरीवर गेल्यावर ग्राहकाची खात्री झाल्यावर हा टपरीवाला टपरीतूनच एका ठरावीक भागातून गुटखा काढून देत असल्याचे आढळले.
व्यसनाधीनता हे एक गुटखा उपलब्ध होण्याचे कारण आहे. संपूर्ण जिल्हाभर गेल्या वर्षभरात ६३ धाडी टाकल्या. यात ४७ दुकाने सील केली असून १२ कोटी २२ लाख ४१ हजारांचा गुटखा जप्त केला आहे. -सुरेश देशमुख, सहआयुक्त, अन्न व औषध प्रशासन विभाग, ठाणे
व औषध प्रशास अधिकारी
गुटखा खाल्ल्याने तोंडाचा कर्करोग होतो. जबडा, जीभ काढण्यासारख्या मोठ्या शस्त्रक्रिया कराव्या लागतात. यासाठी येणारा खर्चही लाखोंच्या घरातला आहे. तरीही, कालांतराने मृत्यू ओढवतो.
- डॉ. कैलास पवार, जिल्हा शल्यचिकित्सक, ठाणे
स्थानक परिसरात विक्री
कळवा, मुंब्रा, कौसा रशीद कम्पाउंड, शीळफाटा, डायघर, कापूरबावडी, महागिरी मार्केट, कासारवडवली, वागळे इस्टेट, इंदिरानगर येथील पानटपरी, किराणा दुकाने, रेल्वे व एसटीस्थानक परिसरातही गुटखा आणि सुगंधित तंबाखू सहज उपलब्ध होते.
सहा कोटींचा गुटखा नष्ट
ठाणे जिल्ह्यात टाकलेल्या ८० धाडींतील सुमारे सहा कोटी रुपयांचा गुटखा, पानमसाला आणि तंबाखूजन्य पदार्थ अलीकडेच शास्त्रोक्त पद्धतीने नष्ट केले आहे. हा गुटखा सुमारे ८० टन असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभाागाने दिली.